#Video : तब्बल १०९ तासानंतर बोअरवेलमधून काढलेल्या फतेहवीरची मृत्‍यूशी झुंज अपयशी

पंजाब : वृत्तसंस्था – बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षीय फतेहवीर सिंह याची तब्बल १०९ तास चाललेली मृत्यूशी चाललेली झुंज अखेर अपयशी ठरली. त्याला अथक प्रयत्नानंतर बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आलं होतं. मात्र बाहेर काढल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पंजाबच्या संगरुर येथील भगवानपुरामध्‍ये १५० फूट खोल बोअरवेलमध्‍ये हा बालक पडला होता.

या घटनेबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याबद्दल दु: ख व्यक्त केले. तसेच त्यांनी राज्यातील सर्व बोअरवेलची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

फतेहवीर सिंह याला तब्बल १०९ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सकाळी ५ वाजता या बाहेर काढल्यानंतर तात्‍काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याचा मृत्यू झाला.

पंजाबमधल्या भगवानपुरा गावात बोअरवेलला कपड्यानं झाकून ठेवण्यात आलं होतं. फतेहवीर खेळता खेळता जाऊन त्या बोअरवेलमध्ये पडला. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. राष्‍ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून (NDRF), पोलिस अधिकारी, स्‍थानिक नागरिकांच्‍या संयुक्‍त मदतीने तब्बल १०९ तास शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

काही तांत्रिक अडचणी आल्या तरीही कडक उन्‍हातही मदत कार्य सुरु होते. बोअरवेलमध्ये असणाऱ्या कचऱ्याचा त्याला प्रचंड त्रास होत होता. त्याला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. मात्र तो दोन दिवस अन्न-पाण्यावाचून होता. मुलाला वाचवण्यासाठी त्या बोअरवेलला समांतर असणारी दुसरी बोअरवेलही खोदण्यात आली. त्यात पाईप टाकण्यात आला. मुख्‍यमंत्र्यांनी बालकास एअरलिफ्‍ट करण्‍यासाठी हेलिकॉप्टरची व्‍यवस्‍था केली होती. मात्र त्याला वाचवण्यात प्रशासनाला अपयश आलं. काल १० जूनला त्याचा वाढदिवस होता.