नीरा जि.प. प्राथमिक शाळा इमारत प्रकरण : लेखी आश्वासनानंतर पालकांचे साखळी उपोषण मागे

पुुुरंदर पोलीसनामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यातील पटसंख्येने मोठी असलेल्या नीरा (ता.पुरंदर ) येथील प्राथमिक शाळेच्या इमारती प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तातडीने उपाययोजना न केल्याने संतप्त पालकांनी व ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.११) जि.प.शाळेसमोर साखळी उपोषण सुरु केले. परंतु केंद्रप्रमुखांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर पालकांनी साखळी उपोषण मागे घेतले.

नीरा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी पर्यंतच्या वर्गात सुमारे साडेपाचशे ते सहाशे मुले आणि मुली शिक्षण घेत आहे. मात्र प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आल्याने विद्यार्थ्याना बसण्यास जागा नसल्याने आक्रमक झालेल्या पालकांनी २८ जानेवारी पासून मुलांना शाळेत पाठविणे बंद केले होते. त्यानंतर जि.प. प्रशासन खडबडून जागे झाल्यानंतर दि. ३१ जानेवारीला जि.प.चे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, पुरंदरचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी येथील शाळेची पाहणी करून तात्पुरत्या स्वरुपात मुलांची व मुलींची बैठक व्यवस्था येथील रयत संकुलात करण्यात आली होती. तसेच शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये पूर्ण वेळ शाळा भरविण्यासाठी रयत संकुलाच्या पटांगणात मॉडेल स्कूलच्या धर्तीवर शेड उभे करून तेथे शाळा भरवायची असे अश्वासन त्यावेळी शिक्षणाधिकारी, पुरंदरचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी पालकांना दिले होते. परंतु याकरिता निधीची गरज होती ते सुद्धा जिल्हा परिषदेने देण्याचे मान्य केले होते.

दरम्यानच्या कालावधीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली .परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषद शाळेसाठी खास बाब म्हणून व फेब्रुवारी महिन्यापासून पालकांचा व ग्रामस्थांचा याकरिता पाठपुरावा सुरु असताना देखील आचारसंहितेच्या आड न येता निधी उपलब्ध करून देऊन १ जून पूर्वी मॉडेल स्कूल च्या धर्तीवर शेड उभे केले असते तर मंगळवारी (दि.११) पालकांवर, ग्रामस्थांवर उपोषणाला बसण्याची वेळ आली नसती .

नीरा येथील पालकांनी व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीला साखळी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर जि.प. शिक्षण विभागाने निधी मंजुरीकरिता मंगळवारी ( दि.११) स्थायी समितीपुढे विषय ठेऊन निधी मंजूर करून घेऊन दि. ३० जून पर्यंत मॉडेल स्कूल च्या धर्तीवर शेड उभे करून मुलासाठी बैठक व्यवस्था करू असे लेखी अश्वासन नीरा बीटचे केंद्र प्रमुख सुरेश लांघी यांनी प्रशासनाच्या वतीने देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर अखेर पालकांनी व ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र येवले, राधा माने, माजी सरपंच राजेश काकडे, उपसरपंच बाळासाहेब भोसले, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, अर्चना पवार, राहुल शिंदे, गणेश तातुस्कर, योगेंद्र माने, मंगेश ढमाळ यांच्या सह पालक व ग्रामस्थ उपोषणास बसले होते.

केंद्र प्रमुख सरेश लांघी यांनी ३० जून पर्यंत मॉडेल स्कूलच्या धर्तीवर शेड उभे करून मुलासाठी बैठक व्यवस्था करण्याचे लेखी अश्वासन दिले असले तरी जो पर्यंत शेड उभे केले जात नाही तो पर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा ठाम निर्धार केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन