भाजपाचं पुढचं मिशन ठरलं, आता करणार ‘या’ गोष्टीचं आयोजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या प्रगतीचा वेग वाढावा, विकासकामं थांबू नयेत यासाठी देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका व्हाव्यात असा विचार मोदींनी अनेकदा बोलून दाखवला आहे. याबद्दल जनजागृती निर्माण व्हावी यासाठी आता भारतीय जनता पक्षानं काम सुरू केलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या जाहीर सभांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये ‘वन नेशन वन इलेक्शन’ची कल्पना मांडली आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान मोदींनी अनेकदा वन नेशन, वन इलेक्शनचा विचार मांडला आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी झाल्यास विकासकामं थांबणार नाहीत. निवडणुकीवेळी लागू असलेल्या आचारसंहितेचा फटका विकासकामांना आणि निर्णय प्रक्रियेला बसणार नाही, अशी भूमिका मोदींनी अनेकदा मांडली आहे. येत्या काही आठवड्यांत भाजपकडून २५ वेबिनार्सचं आयोजन करण्यात आलं आहे. वेबिनारच्या माध्यमातून वन नेशन वन इलेक्शनचे फायदे सांगण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येणार आहे.

वन नेशन, वन इलेक्शनबद्दल जनजागृती करण्यासाठी २५ वेनिबार्सचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं दिली. या वेबिनार्समध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते विचार मांडतील. वन नेशन, वन इलेक्शनचे फायदे त्यांच्याकडून सांगितले जातील. शिक्षण आणि कायदा विषयातील तज्ज्ञांना वेबिनार्ससाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. असं एका भाजप नेत्यानं सांगितलं आहे.

‘वन नेशन, वन इलेक्शन’चा गांभीर्यानं विचार व्हावा
देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात काही महिन्यांनी निवडणुका होत असतात. एका राज्यातील निवडणूक संपल्यावर दुसऱ्या राज्यात निवडणूक होते. त्याचा परिणाम विकासकामांवर होतो. त्यामुळे वन नेशन, वन इलेक्शनबद्दल गांभीर्यानं विचार मंथन होणं, त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे, असं मत मोदींनी अनेकदा व्यक्त केलं आहे.