Kolhapur News : त्यांनी सीमकार्ड बाहेर बाकावर ठेवलं अन् जेलमध्ये पोहचले, तुरूंगरक्षक सहभागी असण्याची शक्यता

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – येथील कळंबा कारागृहा बाहेरील बाकड्यावर सीमकार्ड ठेवले असता आणि परत तेच सीमकार्ड कारागृहात जाणाऱ्या व्यक्तीने आत घेऊन कैद्यांपर्यत पोहोचवल्याचे चौकशीत समोर आल्याची माहिती उघड झाली आहे.ही माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली. या दरम्यान कळंबा कारागृहाच्या भिंतीवरून दहा मोबाईल व गांजा आत टाकल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आणखी दोघांना गुरुवारी ताब्यात घेतले. ओंकार ऊर्फ मुरली दशरथ गेंजगे (वय २२, इचलकरंजी), राजेंद्र ऊर्फ दाद्या महादेव धुमाळ (३०,जयसिंगपूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेलयाची नावे आहेत.

२२ डिसेंबरला रात्रीच्या वेळी भीष्म्या ऊर्फ भीम्या सुभेदार चव्हाण (रा. रांजणी, सांगली), राजेंद्र धुमाळ, ऋषिकेश सदाशिव पाटील ( रा. गंगावेश), जयपाल किसन वाघमोडे (रा.वडिये, सांगली, सध्या रा. गंगावेश) या सर्वानी कळंबा कारागृहाच्या भिंतीवरुन आत मोबाईल टाकल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पैलवान ऋषिकेश व शुभम सोपान ऐवळे (वय २३, रा. शहापूर, इचलकरंजी) याला यापूर्वीच अटक केली आहे. त्यानंतर गुरुवारी राजेंद्र धुमाळ व ओंकार गेंजगे यांना ताब्यात घेतले आहे. गेंजगे हा विटा (सांगली) येथील एका खूनप्रकरणी कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. काही महिन्यांपूर्वी गेंजगे याच्या सहकाऱ्याने सीमकार्ड कारागृहाबाहेरच्या बाकावर ठेवले. आत जाणाऱ्या व्यक्तीने तेच सीमकार्ड कारागृहात गेंजगेपर्यत पोहोचवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

तसेच हेच सीमकार्ड शुभम ऐवळे याच्या नावे असल्याचे तसेच ते कारागृहात गेंजगे व खंडेलवाल यांनी वापरले. त्यामुळे याप्रकरणावरून कारागृहातील काही कर्मचारी सहभागी असल्याचेही दिसते. भिंतीवरून कारागृहात राजेंद्र धुमाळ यानेच आत मोबाईलचे गाठोडे टाकल्याचे चौकशीत उघडकीस आले. कारागृहात सापडलेल्या सीमकार्डचा गेंजगे व खंडेलवाल यांनी किमान तीन महिने कारागृहातून बाहेर कॉलसाठी वापर केल्याची शक्यताही पोलीसाकडून वर्तवण्यात येत आहे कारागृहातील संशयित विकास खंडेलवाल याने कारागृहातून याच सीमकार्डवरुन भीष्म्या चव्हाण याला फोन करून दहा मोबाईल पाठविण्याचा निरोप दिल्याचेही यामधून दिसत आहे.