अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्‍यातील चित्रीकरणावर टांगती तलवार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – चित्रीकरणादरम्यान झालेल्या कोरोनामुळे अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांच्या मृत्यूमुळे सातार्‍यातील चित्रीकरणाावर आता टांगती तलवार आली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे चित्रीकरणाला देण्यात आलेली परवानगी कायम ठेवावी की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनाने काही नियम आणि अटीनुसार चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. सध्या सातार्‍यातील सातारा, वाई, जावळी, कोरेगाव आणि फलटण तालुक्यात चित्रीकरण सुरू आहे. चित्रीकरण सुरू असताना कोरोनाबाधित व्यक्ती, तंत्रज्ञ, कलाकार, सहकलाकार आढळून येत आहेत. त्यातच आई माझी काळुबाई च्या सेटवर जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांचे निधन झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणाला प्रशासनाने जुलै महिन्यात काही अटी आणि शर्तीवर परवानगी दिली होती. गेल्या एक महिन्यापासून या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. पुढील दोन वर्ष चित्रीकरणासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती.

हिंगणगाव (ता फलटण) व वाठार स्टेशन येथील खासगी फार्महाऊसवर हे चित्रीकरण सुरू होते. मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना 27 जणांना कोरोनाची बाधा झाली. दरम्यान, संबंधित संचालकांना व चित्रीकरणाच्या व्यवस्थापनाला मागील आठवड्यात हिंगणगाव ग्रामपंचायतीने लेखी नोटीस बजावली होती. कोणतेही नियम पाळत नसल्याचा आक्षेप यात घेण्यात आला होता. चित्रीकरण सुरू झाल्याची माहिती परिसरात मिळू लागल्यानंतर चित्रीकरण पाहण्यासाठी मोठी गर्दी होत होती. चित्रीकरणाच्या ठिकाणी स्वत:ची सुरक्षा व्यवस्था उभारण्यासंदर्भातही ग्रामपंचायतीने व्यवस्थापनाला कळविले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like