1 तारखेपासून लसीकरणासाठी राज्य सरकार तयार, पण…, आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने लसीकरण मोहीमेची व्यप्ती वाढवण्यात आली आहे. 1 मे पासून 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला लस घेण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे 18 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. मात्र, लसीकरण पुरवठा हे मोठं आव्हान असणार आहे. सीरम संस्था आणि भारत बायोटेकला पत्र दिले आहे. मात्र या दोन्ही कंपन्यांनी अद्याप उत्तर दिले नाही, अशी माहिती देताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 1 तारखेच्या लसीकरण मोहिमेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

राज्यातील कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनेबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजेश टोपे बोलत होते. ते म्हणाले, राज्यात लसीकरण 1 मेपासून करण्याचे राज्याचे नियोजन आहे. लसीकरणासाठी राज्य सरकार तयार आहे. 7 हजार कोटींची लस लागणार आहे. सर्वांना मोफत द्यायची की दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत द्यावी याचा अहवाल कॅबिनेटला दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात लसीकरणासाठी राज्याला मोठा लसीचा साठा गरजेचा आहे. यासाठी सीरम आणि भारत बायोटेकसोबत पत्र व्यवहार केला आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे एक तारखेला लसीकरण कसे करायचे, हा मोठा प्रश्न आहे, अशी चिंता राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

ऑक्सिजन वापराबाबत आज एसओपी देणार

जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर किती मिळालं हे जाहीर करणार आहे. सोळाशे टन ऑक्सीजन वापर करत आहोत. ऑक्सिजनचा कसा वापर करावा याची एसओपी आज सर्व जिल्ह्यातील सर्व सरकारी व खासगी डॉक्टरांना देणार आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नर्सरी स्थापन करणार आहे. तसेच ऑक्सिजनचा पर्यायी साठा ठेवणार आहे. यासाठी प्रत्येक हॉस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट करणार आहे. जर गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजनचा वापर केला तर संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा टोपे यांनी दिला.

राज्यात लसीकरणाचा 1.5 लाखाचा टप्पा पार

5 लाख 34 हजार लसीकरण केले आहे, साठा असेल तर महाराष्ट्रात एक दिवसात आठ लाख लसीकरण करु शकतो. आज पर्यंत दीड कोटी लोकांचं लसीकरण केलं. त्यामुळे देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. दोन टक्क्यांपेक्षा कमी लस वाया गेल्या आहेत. इतर राज्यांच्या तुलेत हे प्रमाण खूपच कमी आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.