राजकीय भविष्याच्या चिंतेने RSS च्या विचारधारेशी हातमिळवणी, राहुल गांधींचा ज्योतिरादित्यांवर ‘निशाणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले की, सर्व लोक अर्थव्यवस्थेची सध्याची अवस्था पाहात आहेत. भारताची ताकद त्याची अर्थव्यवस्था आहे, पण नरेंद्र मोदी यांची विचारधारा आणि योजनांनी अर्थव्यवस्थेचे वाटोळे लावले. कोरोना व्हायरसची समस्या तर खुपच गुंतागुंतीची आहे, परंतु सरकारने या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी जे उपाय करायला हवेत, ते करत नसल्याचे दिसत आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, ही विचारधारेची लढाई आहे, एकीकडे काँग्रेस आहे आणि दुसरीकडे भाजपा-आरएसएस आहे. मला ज्योतिरादित्य सिंधिया यांची विचारधारा माहित आहे, ते माझ्यासोबत कॉलेजमध्ये शिकत होते, मी त्यांना खुप चांगल्या पद्धतीने ओळखतो. ते आपल्या राजकीय भवितव्यासाठी खुप चिंतेत होते, ज्यामुळे त्यांनी खरी विचाराधारा सोडली आणि आरएसएससोबत गेले.

अर्थव्यवस्थेवरून टीका
राहुल गांधी म्हणाले, शेयर बाजारात लाखो लोकांचे नुकसान झाले आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती खुप खराब आहे. काही दिवसापूर्वी मी अर्थव्यवस्थेवर कोरोना व्हायरसच्या धोक्याबाबत बोललो होतो. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधानांचे यावर पूर्णपणे मौन आहे. अर्थमंत्र्यांना तर याबाबत काहीच माहिती नाही.

त्यांनी युपीए सरकारचे कौतूक करताना म्हटले की, आम्हाला अर्थव्यवस्था कशी चालवायची हे माहित आहे. आम्ही अर्थव्यवस्था अधिक चांगली ठेवली होती. मोदींना याबाबत काहीही माहिती नाही. अर्थव्यवस्थेची बिकट स्थिती झाली आहे, ही तर सुरूवात आहे. याची गंभीर परिणाम अजून समोर येणे बाकी आहे. पीएमने या समस्येवर काय उपाय केले आहेत, यावर बोलले पाहिजे, कारण आता खुप उशीर झाला आहे.

राहुल गांधी म्हणाले, 2008 मध्ये सुद्धा अशीच मंदीची लाट होती. आमच्या योजनांनी अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवली होती. युपीएने या देशाची अर्थव्यवस्था दहा वर्षे चालवली आहे. जीएसटीचा परिणाम आज दिसत आहे, आणि ही सुरूवात आहे, जे तरूण हे पहात आहेत, त्यांनी पंतप्रधानांना विचारले पाहिजे की तुम्ही काय केलेत.

राज्यसभेच्या उमेदवारीबाबत राहुल गांधी म्हणाले, मी काँग्रेसचा अध्यक्ष नाही. मी केवळ अर्थव्यवस्थेवर बोलण्यासाठी आलो आहे. करोडो लोकांवर याचा परिणाम होणार आहे. राहुल यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बाबत म्हटले की, आपल्या राजकीय भविष्याची त्यांना चिंता वाटत होती यासाठी त्यांनी आरएसएसची विचारधारा स्वीकारली.

कोरोना व्हायरसबाबत राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले, कोरोना व्हायरसबाबत सरकारने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, एक देश म्हणून आपण अपघाताच्या दिशेने जात आहोत.