Lockdown : रेल्वे आणि एयरलाइन्सनं सुरु केलं तिकिट बुकिंग, 15 एप्रिल पासून करता येणार प्रवास

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केले. तसेच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशातील सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक आणि एयरलाइन्स सेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वे आणि खासगी विमान कंपन्यांनी 14 एप्रिलनंतर प्रवाशांच्या तिकिटांचे बुकिंग सुरु केले आहे.

दरम्यान, लॉकडाऊनची मुदत वाढवली जाऊ शकते असा अंदाज लोकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यावर कॅबिनेट सचिव राजीव गौब यांनी सांगितले की, 21 दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत वाढवण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे वृत्त येत असल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गौब यांच्या खुलाशानंतर भारतीय रेल्वे आणि खासगी विमान कंपन्यांनी 14 एप्रिलनंतरचे तिकिट बुकिंग सुरु केले आहे. या संदर्भात पश्चिम रेल्वेच पीआरओ प्रदीप शर्मा म्हणाले की, भारतीय रेल्वेने 14 एप्रिलनंतर रेल्वे प्रवाशांसाठी तिकिटांची बुकिंग सुरु केली आहे.

तिकिटे ऑनलाईन बुक करता येणार

प्रवाशांना त्यांच्या 15 एप्रिलनंतरच्या प्रवासाची तिकिटे आयआरटीसीच्या अॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहेत. 15 एप्रिलपासून खासगी विमान कंपन्यांनी देखील 15 एप्रिलनंतरची बुकिंग सेवा सुरु करण्यात येणार आहे. स्पाइसजेट, इंडिगो आणि गो एयर सारख्या खासगी विमान कंपन्यांनी देशांतर्गत प्रवासासाठी ऑनलाईन बुकिंग पद्धत सुरु करणार आहे. सध्या विमान कंपन्यांकडून याबाबत कोणतेही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यास पूर्व बुकिंग तिकिटे रद्द केली जाऊ शकता. अशा परिस्थितीत आयआरसीटीसी रेल्वेचे भाडे थेट प्रवाशांच्या बँक खात्यात जमा करेल.