रेल्वेसेवा, मंदिरे उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतरच : राजेश टोपे

कल्याण : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मॉल, सिनेमागृह, बार, हॉटेल्स सुरू करण्यात आली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वेसेवा आणि मंदिरे खुली करण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र, याला दिवाळीनंतरचा मुहूर्त मिळाला असून, रेल्वेसेवा, मंदिरे उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असेही त्यांनी सांगितले.

कल्याणमध्ये राष्ट्रवादीची बैठक व महापालिका हद्दीतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे आले होते. बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नसून रेल्वे सेवा सुरू करण्याचा व मंदिरे उघडण्याचा निर्णय हा दिवाळीनंतरच घेतला जाऊ शकतो. यासाठी नियमावली(एसओपी) तयार करावी लागेल. तसेच, टास्क फोर्सने त्यावर काम सुरू केले आहे, असे टाेपे यांनी स्पष्ट केले.

कल्याणमध्ये राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमण्यासाठी कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे ऐकून घेण्यासाठी आलो आहे. त्यानुसार पक्षश्रेष्ठींकडे अहवाल दिला जाईल. त्यानंतर कल्याण राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमला जाईल. प्रदेशाध्यक्ष पदासाठी जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा आहे, याविषयी टोपे यांच्याकडे विचारणा केली असता हा संपूर्ण निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे, असेही ते म्हणाले.