उकाड्याने हैराण झालेल्या हडपसरवासियांना पावसाचा दिलासा

पुणे : उन्हाचा कडाका आणि उकाड्याने हैराण झालेल्या हडपसरवासियांना आज (सोमवार, दि. २२) दुपारी पावसाने दिलासा दिला. तीनच्या सुमारास हवेत गार वारा सुटला आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने सुरुवात केली. अर्धा तास पाऊस पडल्याने रस्त्यावरून पाणी वाहू लागले. रस्ता ओलसर निसरडा झाल्याने दुचाकी घसरून काही ठिकाणी अपघात झाल्याचे पाहायला मिळाले.

रविवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तसेच सायंकाळी सातनंतर पुन्हा पावसाने सुरूवात केली. त्यामुळे मंडईमध्ये खरेदीकरणारांची चांगलीच धांदल उडाली होती. पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला.

होळीचा सण आठवड्यावर येऊन ठेपला आहे. यावर्षीही होळीच्या अगोदर पावसाने सुरूवात केली आहे. हवामान खात्यानेही पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दुपारी पावसाने जोरदार सुरुवात केल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. त्यामुळे नागरिकांनी उड्डाण पुलाच्या खाली, तर अनेकांनी दुकानांचा आडोसा घेतला. दरम्यान पाऊस सुरू झाल्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होऊ लागली आणि वाहतुकीचा अडथळाही दूर झाला. मात्र, ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. कारण अर्ध्या-पाऊण तासाच्या पावसाने पुन्हा उघडीप दिली. पुन्हा सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.