राज ठाकरेंच्या जीवाला PAK दशहतवाद्यांकडून धोका, सुरक्षा हटवण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे ‘खुजेपणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सरकारने भाजपाच्या(BJP) अनेक नेत्यांसह मनसेप्रमुख(MNS) राज ठाकरे (raj thackeray)  यांची सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उलटसुटल प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान राज ठाकरे (raj thackeray) यांच्या सुरक्षा कपातीवरून मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही आपल्या फेसबूकवर पोस्टकरून यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंच्या जीवाला देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून ते पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका आहे. त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे “खुजेपण” ठळकपणे दाखविणारा असल्याचे म्हंटल आहे.

बाळा नांदगावकर म्हणाले, राज्य सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यात राज ठाकरेंचेही नाव आले. सरकार कोणाचेही असो वास्तवाचे भान ठेवून असे निर्णय घ्यायला हवेत. राज ठाकरेंच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू साहेबांबद्दल वैर बाळगून आहेत, परंतु साहेबांनी कधी अशा हितशत्रूंची तमा बाळगली नाही. साहेबांच्या एका आवाजावर अनेक सामान्य लोकांना संरक्षण देणारे हजारो महाराष्ट्र सैनिक या राज्यात असल्याचे नांदगावकर यांनी म्हंटल आहे.

सरकार दरबारी जी कामे होत नाहीत किंवा ज्या विषयांना मतपेटी साठी टाळले जाते असे अनेक विषय राज ठाकरेंच्या हस्तक्षेपाने निकालात निघतात. राज ठाकरेंच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तसेच पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचे आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे “खुजेपण” ठळकपणे दाखविणारा आहे. चीड या गोष्टीची येते की यात ज्यांना नव्याने सुरक्षा देण्याचा अथवा ज्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे या यादीतील काही नावे बघितल्यास एकच प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? सरकारने ज्या नवीन लोकांना सुरक्षा देण्याचे तसेच सुरक्षा वाढविण्याचे ठरविले त्यापेक्षा तोच पैसा आरोग्य व्यवस्था विकासासाठी वापरला असता तर अतिशय चीड आणणारी भंडारा जिल्ह्यातील १० बाळांचा जीव घेणारी घटना टाळता आली असती, असा टोलाही बाळा नांदगावकर यांनी लगावला.