‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेच्या शुटींगला सुरुवात, तब्बल 3 महिन्यांच्या भेटीनंतर टीम झाली ‘भावूक’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं सारं काही ठप्प झालं आहे. सिनेमांची आणि टीव्ही मालिकांची शुटींगही गेल्या अनेक दिवसांपासून बंदच होती. हळूहळू सारं काही अनलॉक होत आहे. अशात आता कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी मालिकेच्या शुटींगलाही सुरुवात झाली आहे. शुटींग सुरू करण्याआधी परिसर, मेकअप रूम्स, सेटचंही सॅनिटायजेशन करण्यात आलं आहे. सरकारनं आखून दिलेल्या नियमांचं पालन करत आणि योग्य ती काळजी घेत शुटींगला सुरुवात करण्यात आली आहे.

मालिकेबद्दल बोलायचं झालं तर ही मालिका आधीपासूनच प्रेक्षकांचं मन जिंकताना दिसत आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिलं आहे. लवकरच मालिकेचा नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री शुभांगी गोखले, शिवानी सोनार, मनीराज पवार, श्रुती अत्रे, गार्गी फुले आणि इतर कलाकारांनी मोठ्या उत्साहात शुटींगला हजेरी लावली होती.

सेटवरील सर्व कलाकार तंत्रज्ञ आणि इतर मंडळी 3 महिन्यांनंतर भेटत आहेत. एवढ्या दिवसांनी भेटल्यानंतर सर्वजण थोडेशे भावूक झाले होते. गरजेपुरतेच क्रू मेंबर्स शुटींगला उपस्थित असणार आहेत.

शिवानी सोनार हिनं याबद्दल बोलताना सांगितलं की, “इतक्या दिवसांनी कॉल टाईमचा मेसेज पाहून मला खूप आनंद झाला आहे. मी खूप उत्साही आहे. प्रेक्षकांचं प्रेम असंच कायम राहिल अशी आम्हाला खात्री आहे.”

मालिकेच्या एपिसोडबद्दल बोलायचं झालं तर येत्या 21 जुलै पासून सायंकाळी 7 वाजता मालिकेचे नवीन एपिसोड सुरू होणार आहेत.