गुजरातला 30 लाख मग महाराष्ट्राला फक्त 7.5 लाख लसी का? राजेश टोपेंचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. तर महाराष्ट्रासह देशभरात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यातच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रातील लसीकरण मोहीम आणि त्यासंबंधी इतर काही बाबींवर भाष्य करताना टीका केली होती. त्यावरून आता राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यामध्ये टोपे म्हणाले, ‘केंद्राशी सर्व पद्धतीने समन्वय ठेवला जात आहे. 7 दिवसाला 40 लाख लसीचे डोस लागतात. त्यामुळे आठवड्याला 40 लाख आणि महिन्याला 1 कोटी 60 लाख डोस मिळायला हवेत. तरच राज्यातील लसीकरण मोहीम व्यवस्थित सुरू राहू शकेल. पण महाराष्ट्रात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4.5 लाख आहे. मृतांची संख्या 57 हजार तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 30 लाख आहे. मात्र, अशी परिस्थिती असताना आम्हाला फक्त 7.5 लाख लसी का ? असा सवालही उपस्थित केला.

तसेच उत्तर प्रदेश 48 लाख, मध्यप्रदेश 40 लाख, गुजरातला 30 लाख, हरियाणाला 24 लाख अशा पद्धतीने लसींचे वाटप झाले आहे. पण महाराष्ट्राला फक्त 7.5 लाख लसी मिळाल्या आहेत. याबाबत मी डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्त्या करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार, आम्ही त्या दुरुस्त्या होण्याची वाट पाहात आहोत, असेही राजेश टोपे म्हणाले.