शक्य झाल्यास मी ट्रम्प यांच्यासोबत बोलणार : रामदास आठवले

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तथा रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसद भवनात घुसून धुडगुस घातला. लोकशाहीमध्ये या गोष्टीची किंमत काहीच नाही. यावर संपूर्ण जगातून अमेरिकेवर छी थू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेची निंदा केली आहे. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही ट्रम्प यांना फोन करून समज देणार असल्याचे म्हटले आहे.

रामदास आठवले हे आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते. आठवले म्हणाले, मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलेन. त्यांच्यामुळे आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. तसेच हिंसा ही चुकीची असून रिपब्लिकन पक्षाची प्रतिमा मलीन आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव न स्विकारता जनमताचा अनादर करत रिपब्लिकन पक्षाचा अवमान केला. हा लोकशाहीचा अमान आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी पराभव स्वीकारून नवनियुक्त अध्यक्ष बायडेन यांना सहकार्य करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

बुधवारी अमेरिकेच्या संसदेत जो बायडेन यांना अधिकृतरित्या विजयी घोषित करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी ट्रम्प समर्थकांनी संसदेत घुसून धुडगुस घातला. ट्रम्प समर्थकांनी संसदेत तोडफोड करत पोलिसांवर रासायनिक द्रव्ये फेकली. यावेळी दोन समर्थकांकडून स्फोटकं जप्त करण्यात आली. यावेळी पोलीस आणि समर्थक यांच्यात झालेल्या झटापटीत एका महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला.