ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी कोसळली

पोलिसनामा ऑनलाईन टीम – संततधार पावसामुळे देवगड तालुक्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्लयावरील तिहेरी तटबंदी पैकी दुसरी चिलखती तटबंदी साधारणपणे 30 ते 40 फूट कोसळली आहे. त्यामुळे ऐतिहासिक किल्ल्याच्या तटबंदी तातडीने बांधण्याची मागणी शिवभक्तांनी केली आहे.

समुद्राकडील पूर्वेच्या बाजूने असलेली दुसरी चिलखती तटबंदी सतत कोसळणार्‍या पावसामुळे जमीन ओली होऊन कोसळली. किल्ल्यामध्ये काम करणार्‍या कामगारांच्या निदर्शनास हा प्रकार काल सकाळी आल्यानंतर त्यांनी तातडीने पुरातत्व विभागास माहिती दिली. त्यानंतर पुरातत्व विभागाकडून पुढील उपाययोजना करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

रम्यान, पुरातत्व विभागाने या घटनेचे गांभीर्य ओळखून वेळीच योग्य पावले उचलली नाहीत तर या ऐतिहासिक किल्लयाचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी चिंता इतिहासप्रेमींनी व्यक्त केली आहे. किमान पावसाळ्यामध्ये गडकिल्ल्याचे संरक्षण करणे पुरातत्व विभागाने केले पाहिजे, अशी मागणी गडप्रेमींनी केली आहे.