रणजी ट्रॉफीमध्ये आता टॉस होणार नाही, तर ‘हा’ संघ घेणार निर्णय

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – नुकतीच भारतात आयपीयल स्पर्धा पार पडली आणि आता सगळीकडे विश्वचषकाची चर्चा सुरु आहे. भारतात क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळले आणि पहिले जाते,त्यामुळे आंतराराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच स्थानिक क्रिकेटला देखील प्राधान्य देण्यासाठी बीसीसीआयने नुकतीच एक सर्व कर्णधारांची आणि प्रशिक्षकांची बैठक बोलावली होती. खास रणजी ट्रॉफी संमेलनासाठी हि बैठक आयोजित करण्यात आली होती. स्थानिक क्रिकेटसमोरच्या अडचणी आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा या बैठकीत करण्यात आली.

या बैठकीत रणजी ट्रॉफीतील सामन्यांत डीआरएसचा वापर करण्यात यावा,अशी सर्व कर्णधार आणि प्रशिक्षकांनी मागणी केली. मागील मोसमात या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात खराब अम्पायरिंग झाली होती. परंतु मागील मोसमात सामन्यांची संख्या वाढल्यामुळे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रासोबतच डीआरएस लागू करावा, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर टॉसची पद्धत रद्द करून पाहुण्या संघाला फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात यावा अशी देखील मागणी या बैठकीत करण्यात आली.

याचबरोबर खेळाचा स्तर सुधारण्याबाबत, बॉलची गुणवत्ता, स्लो ओव्हर रेट यावरही चर्चा करण्यात आली.आता प्रस्तावित सूचना लागू करण्यासाठी एका विशिष्ट समितीचे गठन करावे लागते, ती कधी गठीत करून या शिफारसी लागू करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.