खंडणी प्रकरणी : पत्रकार, 2 बडतर्फ पोलिसांसह इतर आरोपींना तब्बल ‘एवढे’ दिवस पोलिस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   सेनापती बापट रस्त्यावरील जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व खंडणीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, परवेज शब्बीर जमादार, पत्रकार देवेंद्र जैन, पुतण्या जयेश जितेंद्र जगताप, अमित विनायक करपे यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 20 जुलैपर्यंत पोलिस वाढ केली आहे.

याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे (रा. सिंहगड रोड) व प्रकाश फाले (रा. सांगवी) या दोघांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत बांधकाम व्यवसायिक ऋषीकेश बारटक्के (वय 35, रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. जून 2017 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत ही घटना घडली.
फिर्यादींना सेनापती बापट रस्त्यावरील एका जमिनीच्या दाव्याचा निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचा विश्‍वास आरोपींनी दाखवला. त्यानंतर फिर्यादींनी जमिनीचा व्यवहार केला. परंतु, संशयित आरोपी यांनी बारटक्के यांची विविध मार्गाने तब्बल 72 लाख रुपये घेवून फसवणूक केली. तसेच जागेचा हक्क सोडण्यासाठी 2 कोटी आणि जागेच्या मालकाला अडीच कोटी रुपये देण्याची मागणी फिर्यादींकडे करण्यात आली. व्यवहाराबाबत विचारणा केल्यानंतरही फिर्यादींच्या डोक्‍याला पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी 5 जणांना अटक केली होती. त्यांची आज पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी आणि इतर तपासासाठी सर्वांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. बचाव पक्षातर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे आणि ऍड. प्रसाद कुलकर्णी यांनी जामिनाला विरोध केला.

—कोट—

पोलिसांनी जमिनीच्या व्यवहारातील रक्कम जप्त करण्यासाठी पोलीस कोठडी मागितली आहे. परंतु पोलिसांना जमिनीच्या व्यवहारातील पैसे जप्त करण्याची परवानगी नसते, असे पोलिसनामा ऑनलाइनशी बोलताना वकिल विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले. बचाव पक्षातर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे आणि ऍड. प्रसाद कुलकर्णी यांनी बाजू मांडली.