महिला साफसफाई कामगारांकडे मागितली खंडणी, पत्रकाराविरुद्ध गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा बसस्थानकातील महिला सफाई कामगारांकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पत्रकार सुजित गायकवाड व आणखी एका अनोळखी इसमाविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सफाई कामगार महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (दि. 21) सकाळी १०.३० ते ११.०० वाजण्याच्या सुमारास पंचशीला सोनवणे व पूजा लोहिरे या दोघी बसस्थानकाचे आतमध्ये साफसफाईचे काम करत असताना दोन जण तेथे आले. त्यांनी सफाई कामगारांनी झाडल्यानंतर प्रवाशांकडून ठिकठिकाणी झालेला किरकोळ कचरा पायाने एकत्र केला. तो कचरा एकत्र करुन दोघे त्याची शुटींग करू लागले. सफाई कामगार महिलांनी त्यांच्याकडे तुम्ही कोण आहात, अशी विचारणा करतात त्यांनी पत्रकार असल्याचे सांगितले. त्यांनी सफाई कामगारांना सुपरवायझरला फोन करून पैशाची मागणी करण्यास सांगितले. पैसे न दिल्यास शुटींग माझ्या न्यूज चॅनलवर प्रसारीत करण्याची धमकी दिली.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पंचशीला सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पत्रकार सुजित गायकवाड व आणखी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

खोटा गुन्हा : गायकवाड
श्रीगोंदा बसस्थानकाच्या आवारात साफसफाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्याचे शूटिंग करून बातमी देण्याचा प्रयत्न केला असता तेथील महिला सफाई कामगारांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी माझ्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. असे पत्रकार सुजित गायकवाड यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like