राष्ट्रसंत तरुण सागरजी महाराज यांचे निधन 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

प्रखरवक्ते राष्ट्रसंत तरुण सागर यांचं दीर्घ आजाराने नवी दिल्लीत निधन झाले आहे. ते ५१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे देशभरातून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरू होत्या. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अनेक कुप्रथांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करणारे मुनी अशी तरुण सागर यांची ओळख होती.

पुण्यात त्यांचा २००५ साली चातुर्मास झाला होता. त्यांच्या प्रवचनाने जैन समाजाबरोबरच अन्य समाजातील भाविकही त्यांच्या विचाराचे चाहते झाले आहेत.

तरुण सागरजी यांचा यंदा नवी दिल्लीतील कृष्णा नगर इथल्या राधापुरी जैन मंदिर सुरु होता. सुमारे २० दिवसांपूर्वी त्यांना काविळ झाली होती. त्यावरील उपचारासाठी त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्यांनी उपचार थांबवून चातुर्मास स्थळी जाण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी सायंकाळी ते आपल्या अनुयायांसह चातुर्मास स्थळी परत आले. त्यानंतर त्यांनी पुष्पदंत सागर महाराजांच्या परवानगीने संथारा व्रत धारण केले.

मृत्यू समीप आल्याचे पाहून काही व्यक्ती अन्न-पाण्याचा त्याग करतात. जैन शास्त्राच्या मते याप्रकारच्या मृत्यूला संथारा किंवा संल्लेखना म्हणजेच मृत्यू पर्यंत उपवास करणे असे म्हणतात. याला जीवनाची अंतिम साधना मानली जाते. तरुण सागरजी यांनी संथारा व्रत घेतल्याचे समजताच देशभरातून भाविकांनी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी होऊ लागली होती. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. संथारा म्हणजे जैन धमार्नुसार अन्न-पाण्याचा त्याग करुन मृत्युला सामोरे जाणे.

मुनी तरुण सागर यांचे नाव पवन कुमार जैन आहे. त्यांचा जन्म २६ जून १९६७ मध्य प्रदेशातील दमोह इथल्या गुहजी गावात झाला. त्यांच्या आईचे नाव शांतीबाई आणि वडिलांचे नाव प्रताप चंद्र आहे. मुनीश्री तरुण सागर यांनी ८ मार्च १९८१ रोजी गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी छत्तीसगडमध्ये दीक्षा घेतली.

जैन मुनी तरुण सागर हे आपल्या कडव्या प्रवचनांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच त्यांना क्रांतिकारी संत असंही संबोधले जाते. कडवे प्रवचन नावाची त्यांची पुस्तिकाही प्रसिद्ध आहे. तरुण सागर यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर त्यांनी मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभेतही प्रवचन दिलं होते़ हरियाणा विधानसभेतील प्रवचनावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.