सरकारी कर्मचार्‍यानं केलं गुटख्याचं सेवन, रस्त्यावर थुंकला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणार्‍या एका सरकारी कर्मचार्‍याला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पोलिसांनी. गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणार्‍या एका सरकारी कर्मचार्‍याला रस्ता स्वच्छ करावा लागला आहे.

गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी कोरोना भरारी पथकाच्या शासकीय वाहनातून जाणार्‍या शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍याने मास्क न लावता तोंडात गुटखा खाताना डीवायएसपी प्रवीण पाटील यांनी पाहिले. पोलिसांना ती गाडी थांबवायला सांगितले. हे दोघेही शासकीय कर्मचारी गाडीतून उतरले आणि पुन्हा रस्त्यावर थुंकले. त्यानंतर डीवायएसपी पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की संतापल्या.

आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून योग्य खबरदारी घेण्यासाठी स्वच्छता बाळगण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. पण, शासकीय कर्मचारीच असे वागत असल्यामुळे पाटील यांनी संताप व्यक्त केला.त्यानंतर पाटील यांनी गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणार्‍या कर्मचार्‍याला सर्वांसमोर त्याच्याच हात रुमालाने रस्त्या साफ करायला लावले. कर्मचार्‍याने आधी यास नकार दिला. पण, पोलिसांनी दरडावून सांगितल्यावर या कर्मचार्‍याला आपण थुंकलेल्या गुटखा साफ करावाच लागला.