ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळं नव्या चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनाचा नाट्य-चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. एका संवेदनशील उत्कृष्ट कलाकाराचा असा कोरोनामुळे शेवट होणे हे अनपेक्षित आहे. अशी भावना लोकांकडून व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ कलाकारांनी खरोखरच एवढा धोका पत्करण्याची गरज आहे का, असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही हा निर्णय बदलण्यास भाग पाडण्यात आले. हा निर्णय बदलण्याचा हट्ट आता महाग पडत आहे असे मत काहींकडून सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून एक परिपत्रक काढण्यात आले आहे. चित्रीकरणाच्या ठिकाणी कोविड-१९ चे नियम पाळले जात नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कलाकार, तंत्रज्ञ, कामगार आणि व्यावसायिकांचा रोजगार चालू होऊन उपासमार थांबावी म्हणून चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, नियमांचे पालन होत नसल्याने निर्माते, कलावंत, तंत्रज्ञ, कामगार आणि इतर व्यावसायिकांना खबरदारीचा तसेच निर्वाणीचा इशारा देण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.पुन्हा लॉकडाउन लागू झाला, तर सगळ्यांचेच पुन्हा हाल होतील असा इशारा चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याकडून देण्यात आला आहे.

आशालता यांच्याविषयी बोलताना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त भावुक झाले. त्यांच्याशी खूप जवळचे नाते होते. अतिशय हसरी, खेळकर व्यक्ती होती ती. तिने घाई का केली? अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. मात्र चित्रीकरण करणे योग्य की अयोग्य या संपूर्ण प्रकरणी कोणतेही भाष्य करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वृद्ध कलावंत, लोककला, चित्रपट, नाटक कलाकार यांच्यासाठी अतिदक्षता गरजेची असल्याचे ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वच कलावंतांनी आपल्यावर बंधने घालणे गरजेचे आहे.त्यातही ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ कलावंत यांच्यासाठी हे संकट अधिक परिणाम करणारे आहे, हे मान्य करून कलावंतांनी सादरीकरणाचा मोह आवरता घेतला पाहिजे आणि त्यासाठी आत्मनियंत्रण असणे गरजेचे आहे, असे प्रा. डॉ. प्रकाश खांडगे म्हणाले.

महामंडळाचे निर्देश खालीलप्रमाणे :
१) जिल्हाधिकारी, पोलिसांच्या परवानगीशिवाय चित्रीकरण करण्यात येऊ नये.

२) लहान मुले, ज्येष्ठ कलावंतांची विशेष काळजी घेण्यात यावी

३) चित्रपट महामंडळाच्या सर्व चित्रीकरणांवर भरारी पथकांच्या माध्यमातून बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

४) नियमांचे उल्लंघन होत आहे असे निदर्शनात आले तर, पोलिसांच्या मदतीने चित्रीकरण थांबण्यात येईल.