शिवेंद्रराजेंनी हल्लाबोल केल्यानंतर शशिकांत शिंदेंचं ‘कडक’ प्रत्युत्तर, म्हणाले – ‘माझा वैयक्तिक वाद नाही, पण…’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा-जावळी मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार शशिकांत शिंदे यांच्यात आता राजकारणाचा चांगलाच सामना रंगला असल्याचं दिसून येत आहे. तर शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधकांना संपवण्याची भाषा केल्यामुळं या वादामुले अधिकच राजकारण तापलं असल्याचं म्हटलं जात आहे.

कुडाळमधील एका मेळाव्यात शिवेंद्रराजे बोलत होते तेव्हा त्यांनी म्हटले, ‘माझी वाट लागली तरी चालेल, पण मला त्रास द्यायचा प्रयत्न कुणी करत असेल, तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवेन. काट्यानं काटा कसा काढायचा, हे मलाही माहीत आहे. मी कुणालाही घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवून निवडून आलो आहे. हे विसरू नका, असं आक्रमक भाषेत त्यांनी म्हटले होते. त्यांचा रोख शशिकांत शिंदे यांच्याकडं असल्याचं बोललं जात होतं.

या दरम्यान, शशिकांत शिंदे यांना विचारलं असता, ते म्हणाले, शिवेंद्रराजे माझ्याबद्दल काही बोलले आहेत असं वाटत नाही. त्याचं माझं वैयक्तिक कुठलंही भांडण नाही. मात्र, पक्षपातळीवर विरोध असू शकतो ते नाकारता येणार नाही. आज ते भाजपमध्ये आहेत आणि मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. माझ्या पद्धतीनं साताऱ्यात पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये पक्ष मजबूत करण्याची माझी भूमिका आहे. अनेक लोक माझ्याकडं प्रश्न घेऊन येत आहेत. मी ते सोडवत आहे. याचा अर्थ मी शिवेंद्रराजे यांना आव्हान देतोय, असं समजण्याचं काही कारण नाही. मला माझा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. यापुढंही मी काम करत राहणार आणि त्यासाठी कोणतंही आव्हान स्वीकारण्यास तयार आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.