महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये ‘कोरोना’चं प्रमाण जास्त का ? शास्त्रज्ञांना सापडलं उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. जगभरातील 200 पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्णांमध्ये महिलांपेक्षा पुरुष रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच त्यांचे मृत्यूचे प्रमाण देखील सर्वाधिक आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोना व्हायरसची लागण जास्त का होते, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे आणि त्याच उत्तर शास्त्रज्ञांना सापडलं आहे.

कोरोना व्हायरस ज्या एन्झाइम्समार्फत मानवी शरीरातील पेशीत प्रवेश करतो, ते एन्झाइम्स महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असल्याचे दिसून आलं आहे. आणि हेच त्यामागील कारण असावं असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. Angiotensin-Converting Enzyme 2 हे फुफ्फुस, हृदय, किडनी आणि इतर अवयवांमध्ये सापडतं. मानवी शरीरातील पेशींमधील हे एन्झाइम कोरोना व्हायरसला पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी मदत करतात. नेदरलँडमधील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर ग्रोनिनजेनच्या शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसचा उद्रेक होण्यापूर्वी काही लोकांच्या शरीरातील ACE-2 चा अभ्यास केला होता.

पुरुषांमध्ये ACE-2 चे प्रमाण जास्त
11 युरोपीयन देशातील 3500 पेक्षा अधिक हार्ट फेलर रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील ACE-2 ची पातळी तपासण्यात आली त्यावेळी महिलांपेक्षा पुरुषांच्या शरीरात ACE-2 चं प्रमाण जास्त असल्याचे दिसून आलं. युरोपीयन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार ACE inhibitors आणि angiotensin receptor blocker (ARBs) या औषधामुळे ACE-2 चं प्रमाण वाढत नाही आणि त्यामुळेच हे औषध घेणाऱ्यांचा कोरोनाचा धोकाही वाढत नाही. ही दोन्ही औषधं हृदयाची समस्या असलेल्या, किडनीचा आजार असलेल्या किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांना दिली जातात.

ACE-2 मुळे कोरोनाचा धोका जास्त
संशोधनाचे अभ्यास एड्रियान वुर्स आणि इझिहा समा म्हणाले, फुफ्फुसांप्रमाणेच हृदय, किडनी आणि रक्तवाहिन्यांतील टिश्यूंमध्येही असे एन्झाइम्स आहेत. विशेषत: टेस्टिजमध्ये या एन्झाइम्सची पातळी जास्त दिसून आली आहे. आणि त्यामुळेच पुरुषांमध्ये ACE-2 चं प्रमाण जास्त आहे. परिणामी पुरुषांना कोरोनाचा धोकाही जास्त आहे.