‘आपले पत्र मिळाले..आंदोलनाला शुभेच्छा’

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले होते. त्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी पंतप्रधान कार्यालयाने ‘आप का खत मिला. आंदोलन के लिए शुभकामनाये’, असे पत्र पाठवून खिल्ली उडविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदरचे पत्र अण्णांनी आज प्रसारमाध्यमांना दाखविले.

अण्णा हजारे हे लोकपाल, लोकायुक्त नियुक्ती आणि शेतमालाला दीडपट हमीभाव या प्रमुख मागण्यांसाठी राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसले आहेत. आंदोलनाचा आज चौथा दिवस असताना पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या पत्रात केवळ ‘आपले पत्र मिळाले धन्यवाद. आंदोलनाला शुभेच्छा’, अशा आशयाचा मजकूर आहे. अण्णांच्या मागण्या बाबत काहीही उल्लेख केलेला नाही.

वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय पोटे यांनी उपोषणाचा चौथ्या दिवशी सकाळी अण्णांची नियमित तपासणी केली. त्याचबरोबर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकाने अण्णांची तपासणी केली. अण्णांचा रक्तदाब सध्या स्थिर अाहे. काळजीचे कारण नसले तरी अशक्तपणा आल्याने त्यांनी जास्त बोलू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

माझ्या मृत्यूस मोदीच जबाबदार राहतील
हे सरकार शेतमालाला भाव, लोकपाल व लोकायुक्त यांच्या नियुक्तीबाबत अजिबात गंभीर नाही. त्यामुळे मला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण चालूच राहणार आहे. या आंदोलनात माझा मृत्यू झाल्यास त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असतील, असा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.