राष्ट्रवादीचे नेते खडसेंच्या मागे पुन्हा ED ; उद्या होणार चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यामागे ED च्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यांची शुक्रवारी (दि. 15) सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) चौकशी होणार असल्याची बाब समोर आली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणात चौकशीसाठी खडसे यांना ईडीने समन्स बजावला आहे. काही दिवसांपूर्वी खडसेंना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना क्वारंटाईन व्हावे लागल होते. अखेर उद्या त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपणार असल्याने त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आपली ED कडून चौकशी केली जाऊ शकते, असा अंदाज त्यांनी या आधी व्यक्त केला होता. ‘त्यांनी ईडीची चौकशी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील खडसे यांनी भाजपला उद्देशून दिला होता. त्यामुळे आता खरंच एकनाथ खडसे सीडी लावतात का? आणि या सीडीतून कोणाचा भांडाफोड करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पुण्यात भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसेंची चौकशी केली जाणार आहे. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधऱी यांनी तब्बल 3 कोटी 75 लाखांना खरेदी केली होती. यावेळी खडसे महसूल मंत्री होते. त्यामुळे पदाचा गैरवापर करुन त्यांच्या कुटुंबीयाने जमीन खरेदी केल्याचा आरोप होत आहे.