जीएसटी (GST) घटल्याने हज यात्रेकरुंसाठी ‘अच्छे दिन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने नववषार्पासून हवाई प्रवासावरील जीएसटी दरात कपात केल्याने हज यात्रेकरूंसाठी खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत. जानेवारी महिन्यापासून हवाई प्रवासासाठी १२ टक्यांऐवजी ५ टक्के जीएसटी दर आकारला जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या हज यात्रेच्या तुलनेत यंदा सहा ते दहा हजार रुपये कमी खर्च येणार आहे.

केंद्रीय हज कमिटीच्या मार्फत ग्रीन व अझिझा या दोन श्रेणींतून गेल्या वर्षी १ लाख २८ हजार भाविक सौदी अरेबियाला गेले होते. त्या वेळी प्रत्येक प्रवाशामागे सरासरी २ लाख ४१ हजार ते २ लाख ९५ हजार इतका खर्च आला होता. मात्र, गेल्या वर्षी हवाई वाहतुकीसाठी १२ टक्के जीएसटी आकारण्यात आला होता. केंद्र सरकारने १ जानेवारीपासून विविध २८ सेवांवरील जीएसटीचे दर कमी केले. त्यामध्ये हवाई प्रवासासाठी आकारण्यात येणारा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या प्रवास खर्चात सरासरी ६ ते १० हजारांचा फरक पडणार आहे.

हज यात्रेसाठी भारताला १ लाख ७५ हजार जागांचा कोटा आहे. त्याचा पाठपुरावा केंद्रीय हज कमिटीच्या मार्फत केला जातो. या वर्षी आगस्ट महिन्यात होणाऱ्या हज यात्रेसाठी केंद्रीय हज कमिटीकडे २,६७,२६१ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. राज्यनिहाय संगणकीय सोडत (कुरा) काढून त्यांची निवड केली जाणार आहे.

या वर्षी आगस्टमध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी राज्यातून एकूण ३५ हजार ६५८ अर्ज आले होते. ९ हजार ३३० जागांचा कोटा असल्याने त्यांची निश्चिती संगणकीय लॉटरीद्वारे करण्यात आली. हज हाउसमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या वेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे, अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, राज्य हज समितीचे गफर मगदुम, अधिकारी इम्तियाज काझी आदी उपस्थित होते.

आत्तापर्यंत महिलांना हज यात्रेसाठी मेहरम म्हणजे आपले पती, पिता किंवा भावासमवेतच जाता येत होते. मात्र, गेल्या वर्षापासून केंद्र  सरकारने पुरुषाविना चार महिलांनी एकत्रितपणे हज यात्रेला जाण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी ५०० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यंदा अशा इच्छुक महिलांची संख्या २,२७९ इतकी आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुपटीहून अधिक आहे. गेल्या वर्षी ११०० महिला इच्छुक होत्या.