हज यात्रेच्या नोंदणीला सुरुवात ! ‘कोरोना’मुळे खर्चात सव्वा लाखाची वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हज यात्रेसाठी नोंदणी(Registration for Hajj )ला सुरुवात झाली असून, कोरोनामुळे यंदा यात्रेच्या खर्चात वाढ झाली आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी हज यात्रा रद्द करण्यात आली होती. तेव्हा साधारण अडीच लाख रुपये खर्च येत होता. आता हा खर्च ३ लाख ७५ हजार रुपयांपर्यंत वाढला आहे.

हज यात्रेला जाण्याची इच्छा असणार्‍यांना १० डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. तसेच पासपोर्टची मुदत १० जानेवारी २०२२ पर्यंत असणे आवश्यक आहे. हज यात्रेकरूंची वय १८ ते ६५ असायला हवे.

कोरोनामुळे गेल्या वर्षी हज यात्रा रद्द करण्यात आली होती. आता यापुढील यात्रेसाठी केंद्रीय हज कमिटीने जागांचा कोटा एक तृतीयांश केला आहे. गेल्या वर्षी खासगी आयोजकासह सर्व मिळून १ लाख ७० हजार यात्रेकरूंसाठी जागा निर्धारित करण्यात आल्या होत्या.यावर्षी केवळ ५० हजार जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यात्रेकरूंची संख्या कमी होणे, विमान भाडे, निवास व्यवस्था, भोजन, एअरपोर्ट शुल्क, आरोग्य, गाईड, बस आदी सर्व व्यवस्थेचा खर्च दुप्पट झाला आहे.

दरम्यान, हज यात्रेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करता येणार आहे. हज यात्रेसाठी नंबर लावल्यानंतर सर्वप्रथम दीड लाख रुपयांचा पहिला हप्ता भरावा लागणार आहे. टोटल हज फीचा खर्च ३ लाख ७५ हजारांपासून ५ लाख २५ हजार रुपयांपर्यंत आहे.
हाजींना रवानगी करताना दिली जाणारी रक्कम साऊदी रियाल १५०० रुपये करण्यात आली आहे.

हज कमिटी ऑफ इंडिया चे सी.ई .ओ. मसूद अहेमद खान यांनी पोलिसनामा ऑनलाइन ला सांगितले की, हज यात्रेकरू हजला रवाना होण्यापूर्वी हज कमेटी ऑफ इंडियाच्या कार्यालयात रिपोर्ट करणे आवश्यक आहे. तेथे मेडिकल टेस्ट व कोविड १९ टेस्ट होईल. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच हजला रवाना करण्यात येणार आहे.

दरम्यान, साऊदी अरेबिया जेद्धा येथे पोहाेचल्यानंतर कोविड १९ ची टेस्ट होईल. हॉटेलमध्ये ३ ते ७ दिवस क्वारंटाईन केले जाईल. त्यानंतर उमरा करावा लागेल. भारतात परत येताना दोन्ही देशात पुन्हा कोविड १९ ची टेस्ट करावी लागणार आहे. सर्व हाजींना राहण्यासाठी अजिजियात सवलत देण्यात येईल. मात्र, त्यांना जेवण बनविण्याची परवानगी नाही. हॉटेलमधून जेवण आणावे लागणार आहे.

केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुक्तार अब्बास नक्वी म्हणाले, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची मोठी काळजी घेण्यात येत आहे.