१ कोटीची लाच घेणाऱ्या तहसिलदाराची केवळ ‘एवढ्या’ हजारात जामीनावर मुक्तता

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन – वारस नोंदी प्रकरणात निकालपत्र देण्यासाठी मुळशी तहसिलदार सचीन महादेव डोंगरे (वय-४३ रा. लेझी रॉक सोसायटी, रो. हाऊस नं. ३ बावधन, पुणे) याला १ कोटीची लाच स्विकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या सचिन डोंगरे याची आज न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जामीनावर मुक्तता केली. डोंगरे याचा जामीन विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी मंजूर केला.

तक्रारदार यांचे वारस नोंदीचे प्रकरण मंत्रालय येथुन फेरचौकशीसाठी मुळशीचे तहसिलदार सचीन डोंगरे यांच्याकडे आले होते. या प्रकरणामध्ये तक्रारदार यांना निकालपत्र देण्यासाठी व फेरफार करुन ७/१२ उताऱ्यावर नोंदी घेण्यासाठी १ कोटी रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. पथकाने तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी पंचासमक्ष डोंगरे याने १ कोटी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.

लवासा रोडवरील घोटावडे फाट्यापासू ३ किलोमीटर अंतरावर लाच घेण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदार यांच्याकडे १५ लाख रुपयांच्या चलनी नोटा आणी ८५ लाख रुपये किंमतीच्या चलनी नोटांच्या आकाराचे कोरे कागद असलेल बॅग दिली. तक्रारदार यांनी पैशांची बॅग सचीन डोंगरे यांना देताच रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदिप दिवाण, पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या पथकाने केली.