परमबीर सिंग यांना मोठा दिलासा ! 20 मे पर्यंत अटक करणार नसल्याचं ठाकरे सरकारनं उच्च न्यायालयात सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हप्तावसुलीचा गंभीर आरोप करून चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाणे पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याअंतर्गत 20 मे पर्यंत सिंग यांना अटक करणार नाही, अशी हमी राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. परमबीर यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्याचे प्रकरण असून हा गुन्हा रद्द करण्यासाठी सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 20 मे रोजी सुनावणी होणार आहे.

अकोल्याचे पोलीस अधिकारी भिमराव घाडगे यांनी परमवीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा केलेला आरोप गंभीर स्वरूपाचा आहे. त्यासंदर्भात तपास सुरू असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी न्या. पी.बी. वराळे व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाला दिली. सिंग यांना पोलीस 20 मे पर्यंत अटक करणार नाही, असे खंबाटा म्हणाले. सिंग यांच्यावर 30 एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे. त्यामुळे पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी थोडा वेळ हवा असल्याचे खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले. तोपर्यंत आम्ही (पोलीस) याचिकाकर्त्यांना यांना अटक नाही असे, खंबाटा म्हणाले. न्यायालयाने त्यांचे हे विधान स्वीकारत या याचिकेवरील पुढील सुनावणी 20 मे रोजी ठेवली आहे. दरम्यान, न्यायालयाने तक्रारदारालाही सुनावले. ही घटना 2015 मध्ये घडली आणि 2021 मध्ये तुम्ही तक्रार करता? असा सवाल न्यायालयाने केला आहे.

दरम्यान परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध 22 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.