परभणी : रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या औषध विक्रेत्याला अटक

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने हाहाकार केला आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने कठोर निर्बध लागू केले आहे. तर परभणी येथील एक धक्कदायक घटना समोर आली आहे. तर येथे रुग्णांना उपचार देण्यासाठी रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे उघड झाले आहे.

वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता अशा संकटकाळात या दुकानदाराने पैसे मिळवण्याची संधी साधत काळाबाजार केला आहे. हाके मेडिकल या औषधी दुकान मालकाला ताब्यात घेतले आहे. रेमडिसिवीर इंजेक्शन ६ हजार रुपयांत विकत असल्याची तक्रार महसूल प्रशासनाला अनेकांनी केली होती. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रेमडिसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे काही औषध विक्रेत्यांनी या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू केला असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. यावरून महसूल, अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून त्याला ताब्यात घेण्यात आले. तर उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्या पथकाने केलेल्या कारवाईने काळाबाजार थांबेल आणि गरजू रुग्णांना स्वस्त दारात रेमडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध होतील,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यात करोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसाला ५५ ते ६० हजारांच्या आसपास आहे. तर मृत्यूची संख्याही शेकडोंच्या घरात आहे. परभणीतही करोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यात काल ६८४ करोनाबाधित रुग्ण आढळलेत. तर १२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. २४६ जण करोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. रुग्णालयातील संक्रमित कक्षात आणखी ३ हजार ७६७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ४७२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.