वाहतूकीबाबत तक्रारी नोंदवा ‘सतर्क पुणेकर अॅप’वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वाहतुकीला आणि वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाकडून अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. नागरिकांकडून वाहतूक समस्येबाबत अनेक तक्रारी सोशल मिडीयवर येत असतात. मात्र, त्या समस्या सोडवण्यास अडचणी येत असल्याने वाहतूक विभागाने ‘सतर्क पुणेकर अॅप’ नावाचे मोबाईल अॅप सुरु केले आहे. या अॅपची सुरुवात नविन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून करण्यात येणार आहे.

नागरिकांकडून वाहतूक शाखेच्या फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉटस्अॅपवर तक्रार किंवी फोटो पाठवले जातात. मात्र, यावर कारवाई करताना ठिकाण, वेळ आणि दिनांक समजून येत नाही. त्यामुळे संबंधीतांवर कारवाई करण्यास पोलिसांना अडचणी येत आहेत. कारवाईत एकसुत्रीपणा आणण्यासाठी आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी वाहतूक शाखेने हे अॅप तयार केले आहे.

अॅन्ड्रॉईड फोन धारकांना हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तर आय-फोन वापरणाऱ्या नागरिकांसाठी लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

नागरिकांनी या अॅपचा जास्तीत जास्त वापर करुन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाच्या तक्रारी या अॅपच्या मध्यमातून पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.