अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी( Anvay Naik Suicide Case ) अटकेत असलेले रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे. गोस्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असून आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात (Taloja jail ) करण्याचा निर्णय पोलीसांनी घेतला आहे. त्यानुसार गोस्वामी यांची अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी केली आहे. गोस्वामी यांच्यासह फिरोझ शेख आणि नितेश सारडा या या प्रकरणातील अन्य आरोपींनाही तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे.

गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी 4 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मुंबईतील राहत्या घरातून अटक केली होती. तिथून त्यांना रायगडमध्ये नेले. तिथे न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून गोस्वामी यांना अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात ठेवले होते. दरम्यानच्या काळात गोस्वामी हे जामीनासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली होती. तर अधिक तपासासाठी रायगड पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. या प्रकरणावरून न्यायालयीन लढाई सुरू असतानाच सुरक्षेच्या कारणावरून गोस्वामी यांना अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात नेण्याचा निर्णय़ पोलीस प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, माझ्या जीवाला धोका आहे. अटकेत असताना मला मारहाण झाली. मला माझ्या वकिलांसोबत बोलू दिले जात नाही आहे, असा आरोप गोस्वामी यांनी केला आहे.

पोलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावर उद्या सुनावणी
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना आणखी दोन दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत. या प्रकरणी आता सोमवारी (दि. 9) सुनावणी होणार आहे. अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला रायगड पोलिसांनी रायगडच्या जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबतची सुनावणी शनिवारी पार पडली. आरोपी नितेश सारडा यांच्या वकिलांनी सरकार पक्षातर्फे दिलेला पुनर्निरीक्षण अर्ज आणि स्थगिती अर्ज, तसेच पोलीस कोठडीबाबत केलेला आदेश मराठीत असल्याने, तो इंग्रजीमध्ये भाषांतरित करून मिळण्याकरिता न्यायालयात अर्ज केला. सारडा हे पश्‍चिम बंगालचे राहणारे आहे, तसेच मारवाडी आहेत. त्यांना मराठी कळत नाही, त्यामुळे अर्ज इंग्रजीत द्यावा, असा युक्तिवाद त्यांनी केला.