खळबळजनक ! कोरोनाग्रस्त महिलेच्या घरात मध्यरात्री घुसले नराधम, चाकूचा धाक दाखवत केला गँगरेप

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची बाधा झालेल्या एका महिलेवर तिघांनी चाकूचा धाक दाखवत सामूहिक बलात्कार केला आहे. मध्य प्रदेशच्या इंदौरमधील लसुडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचवटी कॉलनीत गुरुवारी (दि. 13) रात्री ही खळबळजनक घटना घडली आहे. एवढ्यावरच न थांबता नराधमांनी 50 हजाराची रक्कम आणि 2 मोबाईलही लंपास केले आहेत.

या प्रकरणी 37 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने यातील दोघांना अटक केली आहे. तसेच तिसरा आरोपी फरार आहे. अटक केलेले दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची बाधा झालेली 37 वर्षीय महिला क्वारंटाईन झाली होती. ती घरात एकटीच असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या घरात शिरले. दरोडेखोरांनी महिलेला चाकू, कटरचा धाक दाखवत तिच्याकडे पैसे आणि दागिने मागितले. महिलेने त्यांना 50 हजार अन् दोन मोबाईल दिले. यानंतर तिघांनीही महिलेवर सामूहिक बलात्कार केला. मात्र, कोरोनामुळे अशक्तपणा आल्याने ती त्यांना विरोधही करू शकली नाही.पिडीत महिलेने पोलिसांना सांगितले की, कोरोनाबाधित असल्याने ती एकटीच घरी होती. गुरुवारी रात्री दोन वाजता तिला जाग आली त्यावेळी तिघे तिच्या बेडशेजारी उभे होते.

पहाटे 5 वाजेपर्यंत एक आरोपी या महिलेच्या घराबाहेरच थांबला होता. जेणेकरुन ती पोलिसांकडे जाऊन तक्रार देऊ नये. घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळी पोलिसांनी महिलेची वैद्यकीय तपासणी केली. तिच्या तक्रारीनुसार तिघा अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. फरार असलेला आरोपी हा महिलेचा शेजारीच राहतो. त्याने महिलेला घरात एकटे पाहून हा कट रचला होता. फरार असलेल्या आरोपीची माहिती देणा-यास पोलिसांनी 20 हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे. दोन महिन्यांआधीच तो तुरुंगातून बाहेर आला होता.