नांदेड-पनवेल रेल्वेत पुण्यातील महिलांचे दागिने लुबाडले

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेड -पनवेल ही एक्सप्रेस येडशी रेल्वे स्थानकाच्या होम सिग्नलला थांबली असताना चोरट्यांनी खिडकीतून हात घालून पुण्यातील दोन महिलांसह ६ महिल्यांच्या गळ्यातील दागिने लुबाडून नेले. सरिता जगन्नाथ जोशी (रा़ वारजे नाका, कर्वेनगर) या कुटुंबियांसह कोच क्रमांक सातच्या बर्थ क्रमांक १२ व १३ वरुन प्रवास करत होत्या. त्यांच्या गळ्यातील ९५ हजार रुपये किमंतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, पाचशे रुपयांची पर्स व रोख साडेपाच हजार रुपये असा १ लाख १ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. त्यावेळी नम्रता मनिष भाटीया (रा. पिंपरी) यांचा ३० हजार रुपयांचा मोबाईल, ११ हजार ५०० रुपयांचा मोबाईल, १२ हजार रुपयांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, रोख २० हजार रुपये व पाचशे रुपयांची पर्स असा ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.

गिरीजाबाई रोहिदास मुंजाळ (रा. बहिरजी नगर वसमत, जि. हिंगोली) यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसुत्र चोरीस गेले. मंजुषा विठ्ठलराव होणशेटवाड (रा जानकीनगर, नांदेड) यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावुन नेले. रेश्मा गोकुळसिंग राठोड (रा पाचुदा, जि. नांदेड) यांच्या गळ्यातील १५ हजार रुपयांच्या दोन वाट्यांचे सोन्याचे मणी मंगळसुत्र चोरट्यांनी ओढुन नेले. प्रमिला सुर्यकांत चिद्रवार (रा. श्रीरामनगर, परभणी) यांच्या गळ्यातील १५ हजार रुपयांचे मणीमंगळसुत्र चोरट्यांनी हिसकावुन नेले. सरिता जगन्नाथ जोशी( रा. पुणे) यांच्या फिर्यादीवरुन कुडुवार्डी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ मे रोजी रात्री बाराच्या सुमारास घडली.

रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर जागा नसल्यास अनेकदा रेल्वेगाड्या रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकाच्या अलीकडील सिग्नलला थांबविल्या जातात. त्यावेळी चोरटे हे ज्या डब्यांच्या खिडक्या उघड्या आहेत. त्यांच्या खाली उभे राहतात. चोरटे त्यांच्यातील वजनाने लहान असलेल्या अल्पवयीन मुलाला खांद्यावर घेतात. हा मुलगा खिडकीतून आत हात घालून महिलांच्या गळ्यातील दागिने, त्यांच्याकडील पर्स हिसकावून घेतात. अंधारात अचानक खिडकीतून आत हात आल्याने महिला घाबरुन जातात. त्यामुळे काही क्षण त्यांना काय झाले हे समजत नाही. आपले दागिने चोरुन नेले, हे लक्षात येईपर्यंत चोरटे पसार झालेले असतात. त्यामुळे अनेकदा रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकाच्या बाहेर गाड्या सिग्नलसाठी थांबविल्या जाऊ नये अथवा तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून मागणी केली जात आहे.