कंगनाच्या ‘त्या’ ट्विटवरून आ. रोहित पवारांनी भाजपला घेरलं, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि कंगना रणौत यांच्यातला वाद आता चांगलाच रंगला आहे. कंगना रणौत आणि उर्मिला मातोंडकर यांचा एकमेकींशी पंगा काही नवा नाही. विशेषतः उर्मिलानी शिवसेनेचा हात धरल्यानंतर तर दोघींच्यात अनेक वेळा ट्विटर युद्ध पेटलं होतं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कंगनाच्या ट्विटचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी काही दिवसातच मुंबईत एक आलिशान कार्यालय उभं केलं. त्यासाठी त्यांनी ३ कोटी रुपये खर्चून ऑफिस विकत घेतलं. ही बातमी ट्वीट करत अभिनेत्री कंगनाने उर्मिलाला लक्ष्य केलं. अत्यंत खोचक भाषेत उर्मिलावर ट्विटर वार करताना कंगनाने लिहिलं, “मी एवढ्या मेहनतीने घर बांधलं तेही काँग्रेसने तोडलं. खरंच लोक म्हणतात तसं भाजपला साथ देऊन तर माझ्या हाती काय लागलं… तर २०-२५ कोर्ट केसेस. तुमच्याप्रमाणे मी समजदार नाही ना, नाहीतर मी पण काँग्रेसचा हात पकडला असता. किती मूर्ख आहे मी…” कंगनाच्या या ट्विटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

कंगनानं उर्मिला यांच्यावर टीका करताना केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉर्ट ट्विट करत कंगना व भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजपला खूष करण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन महाराष्ट्रद्रोही असणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपचा मुखवटा टरकावत खरा चेहरा पुढं आणल्याबद्दल कंगना राणावतचं अभिनंदनच करायला पाहिजे. या द्रोहाबद्दल भाजपला काय शिक्षा घ्यायची ते आता राज्याची स्वाभिमानी जनताच ठरवेल,’ असा टोला रोहित पवारांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, कंगनानं केलेल्या आरोपांवर उर्मिला मातोंडकर यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे. अभिनेत्री कंगनाच्या ट्वीटनंतर उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “कंगना, तुमची माझ्याबद्दलची जी मतं आहेत ती मलाही माहिती आहेत आणि साऱ्या देशालाही. तुम्ही फक्त वेळ आणि जागा सांग मी २०११ मध्ये अंधेरीमध्ये जो फ्लॅट घेतला होता त्याचे मी पेपर्स घेऊन येते. त्यानंतर तो फ्लॅट विकल्याचेही पेपर्स घेऊन येते. मी केलेला हा सर्व व्यवहार राजकारणात येण्याआधी केला होता. याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही फक्त एक काम करा तुमच्याकडे NCB ला देण्यासाठी जी लिस्ट आहे ती द्या. कारण तुमच्याकडे अशा कोणत्या लोकांची नावं आहेत याची माहिती मलाच काय पण साऱ्या देशाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे.”