भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर ! रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना

पोलीसनामा ऑनलाइन – ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून मुकलेला हिटमॅन रोहित शर्मा दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. या वृत्तामुळे भारतीय चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. आयपीएलवेळी झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा काही सामन्यांना मुकला होता. राहुल द्रविडच्या नेतृत्वात फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर बुधवारी पहाटे रोहित ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे.

दुबईमार्गे ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर रोहितला १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. या कालावधीत रोहित शर्मा आपल्या फिटनेसकडे लक्ष देईल. २९ डिसेंबरला विलगीकरण संपल्यावर तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मा उपस्थित असेल. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची जबाबदारी रोहित शर्मा कडे असणार आहे.

आयपीएल सामन्यावेळी रोहित शर्माच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्याने त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मुंबईच्या काही सामन्यांना मुकला होता. तेव्हाच निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची निवड केली. मात्र, त्यात रोहित शर्माला स्थान दिले नसल्याने निवड समितीवर टीकेचा भडीमार करण्यात आला होता. मग निवड समितीने एनसीएमध्ये फिटनेस तपासणी करुन रोहितला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला.