CAA विरोधातील बहिष्कारावर RSS ची नवी ‘सुपरमार्केट’ नीती

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशातील विविध राज्यांमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात जानेवारी महिन्यांत बरीच निषेध आंदोलनासह बहिष्कारांची प्रकरणे झाली. यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक आणि विशेषतः मुस्लिमबहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली. त्यामुळे इथल्या व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवली होती. या नव्या कायद्याबाबत जनजागृतीसाठी भाजपाने चौकाचौकांमध्ये चर्चांची योजना आखली मात्र त्याचा फायदा झाला नाही.

त्यामुळे आता केरळमध्ये मुस्लिमबहुल भागांतून होत असलेल्या सीसीएविरोधी बहिष्काराला उत्तर देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) अक्षयश्री मिशनअंतर्गत सुपरमार्केट उघडण्याची योजना आखली आहे.

संघ परिवारातील सहकार भारती या संघटनेकडून चालवल्या जाणार्‍या स्वयंसहाय्यता गटांचे हे जाळे आहे. सहा वर्षांपूर्वी सुरु झालेल्या अक्षयश्री मिशनची सुरुवातीला केवळ 24 सुपरमार्केट्स होती. तर गेल्या दहा महिन्यांत 10 आणखीन सुपरमार्केट्स सुरु करण्यात आले आहेत. इतर 40 सुपरमार्केट्ससाठीची नोंदणी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. केरळमधील हिंदू ऐक्यवादी संघटनेचे सरचिटणीस आरवी बाबू यांनी सांगितले की, ‘जानेवारी महिन्यांत सीएएवरील बहिष्काराला उत्तर देण्यासाठी अधिकाधिक सुपरमार्केट लॉन्च करण्यात येत आहेत.

अक्षयश्री मिशन नावाने आधिच काही दुकानं सुरु करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सुरु करण्यात आलेली सुपरमार्केट्स ही सीएएच्या बहिष्काराविरोधात सुरु करण्यात आली आहेत. हिंदु दुकानदारांच्या दुकानातून वस्तू खरेदी न करण्याबाबत हे बहिष्काराचे अभियान सुरु होते. या आंदोलनांमुळे आम्हाला काही शहरांमध्ये एका दिवसापेक्षा अधिक बैठका घ्याव्या लागल्या. ज्या लोकांना दुकाने बंद करण्यास जबरदस्ती केली, त्यांना भाजपाचे म्हणणे ऐकून घ्यायचे नाही. मात्र, आता आम्ही या बहिष्काराला उत्तर देण्यासाठी नवी सुपरमार्केट्स सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले.