Rupali Chakankar : ‘चंद्रकांतदादा, जामीनाबद्दल बोलायचं झालं तर भाजपाचे सर्वच नेते जामीनावर बाहेर आहेत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगाल राज्याच्या निकालानंतर सत्ता हासील करणाऱ्या ममता बॅनर्जी यांचं कौतुक केल्यानंतर राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना जामीनावर सुटला आहात असा हल्लाबोल केला होता. या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तर पाटील यांना भाजपाचे सर्वच नेते जामीनावर असल्याची आठवण सुद्धा करुन दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना चाकणकर म्हणाल्या, “आपण ज्या पद्धतीने भुजबळ यांच्यावर टीका केली, ज्या मग्रुरीमध्ये आपण बोलता ज्या पद्धतीने आपण त्यांना सांगताय की तुम्ही जामीनावर आहात. तर थोडसं मागं वळून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल तुमचे अनेक नेते जामीनावर आहेत. जामीनावरच बोलायचं झालं तर आपल्याशिवाय इतर सर्वांची बोलती बंद होईल कारण तुमचे सर्वच नेते जामीनावर बाहेर आहेत,” असा टोला देखील चाकणकर यांनी लगावला.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, सध्या देशात आणि महाराष्ट्रात करोनामुळे अतिशय वाईट परिस्थिती उद्भवलेली आहे. पण आपल्याला याचं काही घेणं देणं नाही. त्यामुळे सातत्याने आपण याला महागात पडेल त्याला बघून घेऊ, याच्यावरती गुन्हा दाखल करा, त्याला आत टाका यावर आपण PHD करता करता MPhil पण करायला लागले आहात. मात्र तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्हाला तुमच्या गावची ग्रामपंचायत सुद्धा निवडून आणता आली नाही. कोल्हापूरमध्ये तुम्हाला तुमच्या विचारांचा महापौर बसवता आला नाही, चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर सोडून पुण्यात मतदारसंघ शोधावा लागल्याचा असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी ट्विटच्या द्वारे केली आहे.

 

 

 

 

पुढे चाकणकर म्हणाल्या की, “कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीच्या वेळी आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे आपल्याला आपला मतदारसंघ सोडून आमच्या पुण्यातल्या एका महिलेचा सुरक्षित असा कोथरुड मतदारसंघ निवडावा लागला. या साऱ्याचा आपण शांतपणे विचार करावा असं मला वाटतं,तसेच, सध्या महाविकास आघाडीने कोरोनाबाबत कामांना प्राधान्य दिल्याने तुमच्या टीकेकडे कोणी लक्ष देत नसल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. तर जययुक्त शिवार घोटाळा, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा असे अनेक घोटाळे आहेत ज्याची चौकशी अजून बाकी आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीमध्ये करोनाच्या संकटाचा सामना करुन त्यावर काम करणं, लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणं, ही लढाई यशस्वीपणे लढणं अधिक महत्वाचं आहे. असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.