3000 रुपयाची लाच स्विकारताना ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र ग्रामीण हमी योजने अंतर्गत मंजुर झालेल्या विहरीच्या बिलाच्या मस्टरवर सही करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच स्विकारताना केज पंचायत समितीमधील ग्रामविकास अधिकाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई केज पंचायत समितीमधील ग्रामविकास अधिकारी यांच्या कार्यालयात आज (मंगळवार) करण्यात आली. गोवर्धन नरहरी धपाटे (वय-57) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या ग्रामिवकास अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांना महाराष्ट्र ग्रामीण हमी योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली आहे. मंजूर झालेल्या विहरीच्या बिलाच्या मस्टरवर सही करण्यासाठी धपाटे याने तक्रारदार यांच्याकडे 3 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सोमवारी (दि. 26) बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता धपाटे याने लाच स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. आज केज पंचायत समितीमधील ग्रामविकास अधिकारी कार्यालयात सापळा रचून धपाटे याला तक्रादाराकडून 3 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. धपाटे याच्या विरुद्ध केज पोलीस पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक गजानन वाघ आणि त्यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –