रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांचे विरोधक नवाल्नींना अटक

मास्को : वृत्तसंस्था – रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांचे विरोधक असलेली अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांना रविवारी सायंकाळी मॉस्कोत अटक केलीय. भ्रष्टाचाराविरुद्ध वेळोवेळी आवाज उठविणार्‍या, सरकारविरोधी जनमत तयार करण्यात यशस्वी ठरलेल्या नवाल्नी यांचा काटा काढण्याच्या हेतूने मागील ऑगस्टमध्ये विमानामध्ये त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याची शक्यता वर्तविलीय.

जर्मनी देशात वेळीच उपचार मिळाल्याने सावरलेल्या नवाल्नी यांनी पुतीन यांच्या विरोधात शड्डू ठोकण्याचा निर्धार व्यक्त करताच त्यांच्या अटकेची तयारी केली होती. योजनाबद्ध रीतीने ही कार्यवाही केलीय. बर्लिनहून मॉस्कोला येणारे विमान मूळ वेळापत्रकानुसार नुकोवो विमानतळावर उतरणार होते. पण, ऐनवेळी मार्ग बदलून ते शेरेमेत्यीएवो विमानतळावर उतरविले.

नवाल्नी यांचे स्वागत करण्यासाठी नुकोवो विमानतळावर त्यांचे शेकडो समर्थक आले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. विमानतळाच्या टर्मिनलवर गर्दी केलेल्या जमावालाही पोलिसांनी पांगविले आहे. त्यावेळी समर्थकांनी घोषणा दिल्या. रशियामुक्त होईल असे त्यांचे घोषवाक्य होते. त्याच्या जोडीला नवाल्नी-नवाल्नी असा जयघोष केला.

दरम्यान, नवाल्नी यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर पोस्ट केलेल्या लाइव्ह व्हिडिओनुसार विमान दुसर्‍या विमानतळावर उतरत असतानाच अधिकारी त्यांच्याकडे गेले.

नवाल्नी म्हणाले, कशाचीही भीती नाही
बर्लिनहून येणार्‍या विमानामध्ये नवाल्नी यांच्यासह काही पत्रकारांनीही प्रवास केलाय. मायदेशी परतण्याबाबत नवाल्नी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी नवाल्नी म्हणाले की, हे माझे घर आहे. मला कशाचीही भीती वाटत नाही. मॉस्कोमध्ये परतल्यास दीर्घकाळ तुरुंगात डांबले जाईल, अशी कल्पना असून देखील नवाल्नी यांनी निर्धार व्यक्त केलाय. त्यानंतर पोलिस घेऊन जाण्याअगोदर त्यांनी पत्नी युलिया हिची भेट घेतली. यासंदर्भात अधिकार्‍यांनी इतकेच सांगितले शिक्षेबाबत न्यायालय या महिन्यामध्ये निर्णय घेईपर्यंत नवाल्नी यांना तुरुंगात ठेवण्यात येईल.

पोलिसांनी वकिलांना संपर्कास केली मनाई
नवाल्नी यांच्या वकील ओल्गा मिखाईलोवा यांनी एको ऑफ मॉस्को या नभोवाणी केंद्राला सांगितले, विमानतळानजीक खिम्की पोलिस ठाण्यामध्ये नवाल्नी यांना डांबून ठेवले होते. तेथे त्यांना भेटण्यास किंवा संपर्क साधण्यास मला मनाई केलीय. पोलिसांनी मला त्या इमारतीत प्रवेश करू दिला नाही. नवाल्नी यांच्या प्रवक्त्या किरा यार्मीश यांनी सांगितले की, इतर 2 वकिलांना पोलिसांनी इमारतीमध्ये प्रवेश दिला, पण नवाल्नी यांना भेटू दिले नाही.