रशियानं अमेरिका अन् ब्रिटनला टाकलं मागे ! भारताला देखील देणार स्वतःची ‘कोरोना’ वॅक्सीन

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   ऑक्टोबरपासून रशिया आपल्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस लसीकरण कार्यक्रम सुरू करणार आहे. रशिया जो दावा करीत आहे त्याचा अर्थ असा आहे की ते लस तयार करण्यात अमेरिका, ब्रिटन आणि चीनपेक्षाही पुढे गेले आहेत. तथापि, रशियाच्या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. परंतु जर रशियन कोरोना लस प्रथम यशस्वी झाली तर भारताला देखील त्याचा पुरवठा होऊ शकेल.

theguardian.com च्या अहवालानुसार रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की मुख्य लसीला 10 ऑगस्टपर्यंत मंजुरी देण्यात येईल. भारत, ब्राझील आणि सौदी अरेबिया यासारख्या देशांशी लसींच्या विक्रीवरही काम करण्याचा त्यांचा मानस आहे. रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की भारतासह या देशांनी त्यांची लस खरेदी करण्यात रस दाखविला आहे.

येत्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये लस उत्पादन सुरू होईल आणि ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू होईल असे रशियाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे लसीच्या चाचण्यांना वेग देण्यासाठी रशियामधील संशोधकांनी स्वतः ही लस घेतली होती. त्याच वेळी, अमेरिका-ब्रिटन यांच्या कोरोना लसीच्या चाचणीबद्दल बरीच माहिती प्रकाशित केली गेली आहे, परंतु रशियन लसीबद्दल मर्यादित माहिती उघडकीस आली आहे. अपुष्ट अहवालात असे देखील म्हटले जात आहे की एक रशियन लस देशातील श्रीमंत लोकांना उपलब्ध देखील होऊ लागली आहे.

रशियाचे उद्योग व व्यापार मंत्री डेनिस मंटुरोव्ह म्हणाले आहेत की रशिया एका महिन्यात लक्षावधी डोस तयार करू शकतो. ते म्हणाले की एक कंपनी रशियामध्ये तीन ठिकाणी उत्पादन तयार करत आहे. यापूर्वी रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को म्हणाले होते की क्लिनिकल चाचणी पूर्ण झाली आहे आणि आता कागदी काम केले जात आहे.