राज्यात कडक निर्बंध लावण्याचं हे नेमकं कधी अन् कसं ठरलं? काय होती भाजप-मनसेची भूमिका? ‘सामना’तून खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता संसर्ग थाबवण्यासाठी सरकारने ‘मिशन ब्रेक द चेन’ म्हणजेच मिनी लॉकडाऊन लागू केला. मात्र सुरुवातीला याला भाजप, मनसेसह अनेक पक्षांनी तसेच अनेक संघटनांनी विरोध केला होता. पण त्यानंतर वाढता विरोध लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वच विरोधी पक्षांशी चर्चा केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी सहकार्याचं आश्वासन दिल्यावरच मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्बंधांची घोषणा केली,’ असा गौप्यस्फोट शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात केला आहे.

लॉकडाऊनला भाजपसह मनसेचा तीव्र विरोध होता. लोकांच्या पोटापाण्याची सोय लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी करावी अशी या पक्षांची मागणी होती. त्यामुळं लॉकडाऊनबाबत संभ्रम होता. या पक्षांनी विरोधाची भूमिका सोडली नसती तर लॉकडाऊनचा फायदा झाला नसताच, शिवाय कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: पुढाकार घेत फडणवीस व राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर सरकारनं लॉकडाऊन जाहीर केल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

लोकांमध्ये असलेल्या बेफिकीरीबद्दलही शिवसेनेनं चिंता व्यक्त केली आहे. एकीकडं जमावबंदी व संचारबंदीची चर्चा सुरू असतानाही जुहूच्या चौपाटीवर रविवारी संध्याकाळी प्रचंड गर्दी उसळल्याचं दिसलं. पुण्यातील मंडया आणि बाजारपेठांत पाय ठेवायला जागा नाही. त्यापेक्ष विशेष म्हणजे पंढरपूरच्या पोटनिवडणुक प्रचारात विनामास्क असलेली अतिउत्साही गर्दी पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनाही स्वतःचा मास्क काढून भाषण करण्याचा मोह आवरला नाही. बहुतेक पुढाऱ्यांना समोरच्या गर्दीत कोरोना चिरडून मेला असेच वाटू लागले आहे. तिकडे पश्चिम बंगालातही निवडणूक प्रचाराची रणधुमाळी पाहता तेथेही त्यात कोरोना चिरडला गेला आहे का, अशी शंका येते, असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.

‘पंतप्रधान मोदी, तुम्ही परमेश्वराचे अवतार आहात काय?’ असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी त्राग्याने विचारला तो खराच आहे. मोदी हे नक्कीच परमेश्वराचे अवतार नाहीत. तसे असते तर त्यांनीही जादूच्या छडीने छुमंतर करून करोनाचा पराभव केला असता’, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.