सचिन सावंत यांचे टीकास्त्र; म्हणाले – ‘मराठा आरक्षणाबाबत भाजपचं पोटात एक आणि ओठात एक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे येथील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे पत्रकार परिषदेत बोलत होते, त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. सेव्ह मेरिट ट्रस्ट नावाच्या संघटनेकडून मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल करण्यात आली होती. तर या संघटनेचे नागपूर कनेक्शन समोर आले आहे. त्या संघटनांचे सर्वजण भाजपचे पदाधिकारी असल्याचे उघड झाले आहे. यावरून पोटात एक आणि ओठात एक अशी भाजपची मराठा आरक्षणाविषयी भूमिका आहे. असे टीकास्त्र सचिन सावंत यांनी सोडले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत भाजप प्रामाणिक नाही. असे म्हणत, मराठा आरक्षणाची लढाई सुरू असताना भाजपची भूमिका प्रामाणिक होती का? याचे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी द्यावे असे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच, केंद्र सरकारकडून देशपातळीवर पुरवण्यात आलेले व्हेंटिलेटर नादुरुस्त अवस्थेतील आहे. या संदर्भातील कंपन्या गायब आहेत. हा घोटाळा महाराष्ट्रात उघडकीस आला देशात भयानक स्थिती आहे. व्हेंटिलेटर घोटाळा होणं दुर्दैवी आहे. जेवढे व्हेंटिलेटर पुरवण्यात आले त्याची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी सुद्धा सचिन सावंत यांनी केली आहे.

पुढे सावंत म्हणाले, विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण स्वतःच्या स्वार्थासाठी वापरलं. ते लोकांना फसवण्यासाठी काहीही करतात. ते मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत टीका सचिंत सावंत यांनी शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांच्यावर केली आहे. या दरम्यान, देशपातळीवर PM केअर फंड गोळा करण्यात आला त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच माहिती अधिकारात प्रश्न विचारता येत नाही परंतु, केंद्राने शेवटपर्यंत यावर उत्तर दिली नाहीत. असे देखील सावंत यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेदरम्यान काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.