Mansukh Hiren death case : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

ठाणे : मनसुख हिरेन यांच्या मृत्यु प्रकरणात वादग्रस्त ठरलेले व एटीएसकडून चौकशी करण्यात आलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर येत्या १९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची बदली करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार त्यांची गुप्ता वार्ता विभागातून विशेष शाखा १ मध्ये करण्यात आली असून नागरी सुविधा केंद्र विभागाचा पदभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला असून एटीएसने आतापर्यंत तीन वेळा सचिन वाझे यांची चौकशी केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आँटिलिया घराबाहेर स्कॉपिओ कार सापडली होती. त्याचा तपास सचिन वाझे यांच्याकडे होता. याप्रकरणाचा तपास आता एनआयए करत आहे. त्यामुळे एनआयएही सचिन वाझे यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. मनसुख वाझे यांच्या पत्नीनेही आपल्या जबाबात सचिन वाझे यांनीच आपल्या पतीचा खुन करविला असा आरोप केला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांनी आता अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.