Sachin Vaze Case : फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट, शिवसेनेच्या 2 नेत्यांची दिली नाव?

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन – अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. आता या प्रकरणी भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 18) दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. यावेळी वाझे प्रकरणात समाविष्ट असलेल्या शिवसेनेच्या दोन नेत्याविरुद्ध केंद्र सरकारच्या माध्यमातून कठोर कारवाई करावी, तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी एनआआए मार्फत करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. यावेळी राज्यातील भाजपचे नेते आणि खासदार उपस्थित होते.

दरम्यान, बुधवारी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेता सचिन वाझे यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. वसुलीच्या रॅकेटमध्ये वाझे यांचे नाव आले होते, अशा स्थितीतही मी मुख्यमंत्रिपदी असताना वाझे यांची पुन्हा नियुक्ती व्हावी यासाठी उद्धव ठाकरे माझ्यासोबत बोलले होते. पण त्यांना पुन्हा सेवेत घेण्यास माझा विरोध होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता. शिवसेनेसोबत वाझे याचे अतिशय जवळेचे संबंध होते. एवढेच नव्हे तर अनेक नेत्यांसोबत त्याचे व्यवसायिक संबंध होते. हे सर्व वाझे एकटा करू शकत त्यामुळे त्यांच्यासोबत आणखी काहीजण आहेत. हे एका पोलीस अधिकाऱ्याचे काम नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.