सदाभाऊ खोतांचं अमोल मिटकरींना प्रत्युत्तर, म्हणाले- ‘आम्ही दारूच नाही, गांजाही विकला असेल, पण…’

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून सुरू झालेलं हे वाकयुद्ध आता थांबताना दिसत नाहीये. या वादात आता माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी उडी घेतली आहे. मिटकरींनी केलेल्या पडळकरांवरील टीकेला आता खोत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, अमोल मिटकरी यांनी आरोप केला होता की, दारू विकली म्हणे. मी म्हणतो गांजाही विकत होतो. तू येतोस का चिलीम लावायला. आम्ही सगळं केलं परंतु सामान्य माणसांचे खिसे कापले नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते अमोल मिटकरी ?
गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधताना अमोल मिटकरी म्हणाले होते की, तू बोलतो किती ? तुझी औकात किती ? तू आहेस केवढा ? मला एक पत्रकार बोलला म्हणे बोला त्याच्यावर, मी म्हटलं, माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. समोर कॅमेरा असल्यानं मी नाव न घेता बोलणार आहे असंही ते म्हणाले होते.

पुढं बोलताना ते म्हणाले, मी नागज फाट्यावर दारू विकली नाही किंवा कोणत्या आजींची 2 कोटींची जमीन बळकावली नाही. मी कुत्र्यांना भीत नाही. एखादं श्वान बैलाच्या मागे भुंकतं. बैल एकदा, दोनदा ऐकतो, तिसऱ्यांदा लाथ मारतो, मग कुत्रा मागेच जातो असा टोलाही त्यांनी लगावला होता. यालाच आता खोतांनी उत्तर दिलं आहे.