‘चिलटासारखं आंदोलन काय करता, दम असेल तर मैदानात या’ : सदाभाऊ खोतांचं राजू शेट्टींना खुलं आव्हान 

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – आज परभणीत टोमॅटोला कमी भाव मिळत असल्यानं स्वाभिमानीच्या शेतकऱ्यांनी याचा निषेध नोंदवला. आज स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून आंदोलन केलं. यालाच आता सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना खुलं आव्हान दिलं आहे. चिलटासारखं आंदोलन काय करता, दम असेल तर मैदानात या, असं खोत यांनी म्हटलं आहे.
इतकेच नाही तर त्यांनी राजू शेट्टींवर टीकाही केली. राजू शेट्टींनी ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीवर 15 वर्षे टीका केली, त्यांच्याच गळ्यात गळा घालून सध्या ते फिरत असल्याचं वक्तव्य खोत यांनी केलं. खोत म्हणाले की, “राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात आंदोलनं केली. त्यावेळी झालेल्या पोलीस कारवायांमध्ये शेतकरी जखमी झाले. मावळमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता. मात्र ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात शेतकऱ्यांनी संघर्ष केला, त्याच पक्षांच्या नेत्यांच्या गळ्यात गळे घालण्याचं काम राजू शेट्टी करत आहेत.” याशिवाय, ‘शेतकऱ्यांच्या रक्तानं माखलेल्या नेत्यांसोबत आघाडी करण्याची तयारी शेट्टींनी सुरू केली आहे,’ असं टीकास्त्र खोत यांनी सोडलं.
याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचीही राज्यमंत्री सदाभाऊ खोत खिल्ली उडवली. ते म्हणाले की, ” चिलटासमोर आंदोलन काय करता. दम असेल तर मैदानात या.” इतकेच नाही तर वेळ, काळ, स्थळ ठरवा. मैदानात दोन हात करा असंही खोत म्हणाले.
गाडीसमोर टोमॅटो फेकून निषेध 
बुधवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमासाठी खोत परभणी येथे आले होते. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर खोत यांच्या वाहनांचा ताफा स्टेशन रोड, बसस्थानक मार्गाने पाथरीकडे निघाला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून आपला निषेध नोंदवला. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं समजत आहे.