एकादशीच्या दिवशी अमेरिकेनं चंद्रावर उपग्रह सोडला म्हणून प्रयोग यशस्वी : संभाजी भिडे

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा अजब तर्क मांडला आहे. अमेरिकेने एकादशीच्या दिवशी उपग्रह सोडला म्हणूनच तो प्रयोग यशस्वी झाला असे अजब विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या अजब विधानामुळे ते टीकेचं लक्ष्य होण्याची शक्यता आहे. दुर्गामाता दौड या कार्यक्रमासाठी सोलापुरात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

संभाजी भिडे म्हणाले की, ‘भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नसून एक सेकंदांचा हजारावा भाग मोजण्याची पद्धतसुद्धा भारतीय कालपमापन पद्धतीमध्ये आहे. अमेरिकेने याच कालमापन पद्धतीचा वापर केल्यामुळे त्यांचा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयोग यशस्वी झाला. अमेरिकेने आतापर्यंत 38 वेळा चंद्रावर उपग्रुह सोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला म्हणूनच तो यशस्वी झाला. ‘

यापूर्वीही त्यांनी अजब विधाने करून वाद ओढवून घेतले आहेत. माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने अपत्यप्राप्ती होते असा अजब तर्क त्यांनी यापूर्वी मांडला होता. गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांपेक्षाही श्रेष्ठ होता असं विधान त्यांनी केलं होत. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे आणि राज्यघटनाही आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून लिहिली. असे अजब तर्क त्यांनी मांडले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –