पुणेरी पगडीचा आकार असलेल्या मेट्रो स्टेशनला संभाजी ब्रिगेडचा विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे मेट्रोच्या दोन स्थानकांना पुणेरी पगडीचा आकार देण्यात येणार आहे. डेक्कन आणि संभाजी उद्यानातील स्थानकाला पगडीचा आकार दिला जाणार आहे. पुण्यात पुणेरी पगडी आणि फुले पगडी यांच्यातील वाद सर्वांना माहीतच आहे. त्यातच आता संभाजी ब्रिगेडने मेट्रो स्टेशनला देणाऱ्या पुणेरी पगडीच्या आकाराला विरोध केला आहे. पुणेरी पगडीचा आकार देऊ नये, अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडने मेट्रो प्रशासनाला दिले आहे.

मेट्रो स्टेशनला पुणेरी पगडी देण्यावरून संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. पुणेरी पगडी विषमतेचे प्रतिक आहे. पुणेरी पगडी घालून बहुजनांवर अत्याचार केला आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. तर पुणेरी पगडीऐवजी छत्रपतींचा जिरेटोप, राजमुद्रा, शिंदेशाही पगडी, फुले पगडी, तुकोबांची पगडी आणि शाहू फेटा या प्रतिकांची स्थानकं उभारण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच या माध्यमातून समाजात समता आणि बंधुत्व निर्माण करावं, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केली.

छत्रपती संभाजी उद्यानातील स्थानकाला छत्रपती संभाजी महाराज मेट्रो स्थानक, डेक्कन जिमखान्याला संत तुकाराम महाराज, शिवाजीनगरला छत्रपती शिवाजी महाराज, स्वारगेटला राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि नळ स्टॉप – कर्वे रोडला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले किंवा लहुजी वस्ताद साळवे अशी स्थानकांची नावे देण्याची मागणीही ब्रिगेडने केली आहे.

दरम्यान, मेट्रोच्या बैठकीत ब्रिगेडच् मागण्यांचा बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे मेट्रो प्रशासनाने म्हटले आहे. तर यावरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ब्रिगेडने दिला आहे. त्यामुळे पुणे पगडीच्या राजकारणावरून ढवळून निघणार आहे.