नाराजीनाट्य ! सांगलीच्या कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ‘हजर’ तर खासदार संजयकाका पाटील ‘गैरहजर’

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी खासदार संजयकाका पाटील आग्रही आहेत. बदलाचा निर्णय आजच झाला पाहिजे अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी, अशी मागणी खासदार पाटील यांची होती. पण पहिल्यांदा महापालिकेचे पाहू, नंतर जिल्हा परिषदेची चर्चा करू, असा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सूर होता, तो मान्य नसल्याने खासदार पाटील यांचा पारा चांगलाच चढला थेट तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले. बैठकीत घडलेला हा प्रकार पाहून सदस्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली होती.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कार्यक्रमानिमित्त रविवारी (दि. 14) सांगली होते. मात्र खासदार संजयकाका पाटील या कायर्क्रमास गैरहजर होते. विजयनगरच्या एका हॉटेलमध्ये पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक होती. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते. दरम्यान बैठक संपतेवेळी खासदार संजयकाका पाटील बैठकीच्या ठिकाणी आले. खासदार पाटील प्रदेशाध्यक्षांना भेटण्यासाठी आत चर्चेसाठी गेले पण अवघ्या दोन-तीन मिनिटातच बाहेर पडले.

त्यावेळी संजयकाकांच्या चेहऱ्यावर काहीतरी बिनसल्यासारखे दिसले. बाहेर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. त्यांनी खासदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच न बोलता पाटील थेट गाडीत जाऊन बसले. गाडीत बसताना दरवाजा जोरात आपटला. त्यावेळी जो आवाज आला तो बराच काही सांगणारा होता. खासदार जाताना पाहून एक व्यक्ती संजयकाका पाटलांच्या गाडीजवळ आला आणि त्याने दादा परत बोलवत असल्याचा निरोप दिला. पण तरीही खासदार थांबले नाहीत, त्यांनी तिथून निघून जाणे पसंत केले.